प्रतिनिधी / बेळगाव
सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी सांबरा ट्रेनिंग स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मावळते स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मुत्तू यांनी आपल्या पदाची सूत्रे एस. श्रीधर यांच्याकडे सुपूर्द केली.
एस. श्रीधर हे 14 जून 1989 मध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर विभागात रुजू झाले. ते कोरोकोंडा सैनिक स्कूल आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. हवाई दलात त्यांची 33 वर्षांची सेवा असून भारतीय हवाई दलाच्या वेगवेगळय़ा विमानांचे 5 हजार तासांचे हवाई उड्डाण त्यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीर व अंदमान, निकोबार येथील हवाई दलाचे चीफ ऑपरेशन ऑफिसर्स म्हणून त्यांनी काम केले. 1993 आणि 2005 मध्ये एअर कमांडिंग इन चीफ आणि कमांडर इन चीफ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. हवाई दलामध्ये त्यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल 2011 मध्ये श्रीधर यांना वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.