वृत्तसंस्था/ वाराणसी
ज्ञानवापीमध्ये शुक्रवारी 35 व्या दिवशी पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने विरोध केला. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत सर्वेक्षण रोखण्याचा हट्ट करत समितीच्या सदस्यांनी पुरातत्व पथकाला परिसरात प्रवेश करू दिला नाही. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी विरोधादरम्यान सर्वेक्षणाचे कार्य होऊ शकलेले नाही. गुरुवारी देखील सर्वेक्षण सुरू झाल्यावर मुस्लीम बाजूने विरोध दर्शविल्याने सर्वेक्षण रोखण्यात आले होते.
न्यायालयाच्या आदेशानंतरच सर्वेक्षण करू दिले जाणार असल्याचे मस्जिद कमिटीचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाचे पथक आणि मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु सहमती निर्माण होऊ शकली नाही.
जिल्हा न्यायाधीशांनी सर्वेक्षण आणि त्याचा अहवाल सादर करण्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंतच मुदत दिली होती. सर्वेक्षण अहवाल सादर न करता न्यायालयाकडून 8 आठवड्यांची वाढीव मुदत मागण्यात आली. यामुळे सुनावणीनंतरच पुरातत्व पथकाला ज्ञानवापीमध्ये प्रवेश दिला जाईल असे मस्जिद कमिटीकडून म्हटले गेले. पुरातत्व विभागाचे 30 सदस्यीय पथक यादरम्यान ज्ञानवापी परिसरातच उपस्थित होते.
ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षणाला अंजुमन इंतजोमिया मस्जिद कमिटी 3 सप्टेंबरपासून सातत्याने विरोध दर्शवत आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाला 4 सप्टेंबर रोजीच्या सुनावणीनंतर सर्वेक्षण न करण्याचे आवाहन मुस्लीम बाजूने केले होते, परंतु पुरातत्व विभागाने सर्वेक्षण सुरूच ठेवले होते. याचदरम्यान गुरुवारी मस्जिद कमिटीच्या विरोधादरम्यान पुरातत्व विभागाच्या पथकाला ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षण करता आले नव्हते. जिल्हाधिकारी एस. राजलिंगम आणि अप्पर पोलीस आयुक्त एस. चनप्पा यांनी दोन्ही गटांना समजाविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सहमती होऊ शकली नव्हती.