वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2026 च्या विश्वचषक पात्रता फेरीत अर्जेंटिनाने त्यांचा कर्णधार लिओनेल मेस्सी नसतानाही बोलिव्हियावर 3-0 असे वर्चस्व राखून त्यांचा दुसरा विजय मिळवला. मेस्सीच्या जागी कर्णधारपद सांभाळणाऱ्या एंजल डी मारियाने मध्यंतरापूर्वी दोन गोल नोंदविण्यासाठी साहाय्य करत उत्कृष्ट कामगिरी केली.
अर्जेंटिनाला सामना सुरू होऊन अर्ध्या तासानंतर पहिले यश मिळाले जेव्हा चेल्सीच्या एन्झो फर्नांडेझने डी मारियाच्या अचूक क्रॉसचा फायदा उठवत जवळून फटका हाणला आणि चेंडू जाळीत सारत त्याचा तिसरा आंतरराष्ट्रीय गोल नोंदविताना अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत बोलिव्हियासमोरची आव्हाने वाढली. कारण त्यांच्या रॉबर्टो फर्नांडेझला क्रिस्तियान रोमेरोस धोकादायक पद्धतीने पाडल्याबद्दल लाल कार्ड दाखविण्यात आले. त्यामुळे बोलिव्हियाच्या संघातील खेळाडूंची संख्या कमी होऊन 10 वर आली.
अर्जेंटिनाने आपले वर्चस्व कायम राखताना निकोलस टॅगलियाफिकोने विश्वविजेत्या संघाच्या तर्फे आपला पहिला गोल करून आघाडी वाढवली. त्याने 42 व्या मिनिटाला डी मारियाने हाणलेल्या फ्री-किकवर हेडरने गोल केला. 83 व्या मिनिटाला निकोलस गोन्झालेझने हाणलेला शक्तिशाली फटका जाळीत गेला आणि अर्जेंटिनाच्या 3-0 विजयावर शिक्कामोर्तब झाले.