ऑनलाईन टीम / पुणे :
एका शस्त्रधारी तरुणाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणाला पकडण्यात आले. बंदूक, चाकू आणि विविध यंत्रणांची ओळखपत्रे या तरुणाकडून जप्त करण्यात आली आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
शेख नूर आलम असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आज सकाळी हरीश चॅटर्जी रस्त्यावरील बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पोलीस स्टिकर असलेल्या कारमधून आला. सुरक्षारक्षकांनी त्याची चौकशी केली असता त्याने बॅनर्जी यांना भेटायचे असल्याचे सांगितले. मात्र, त्याने परिधान केलेला काळा कोट आणि गाडीवर पोलीस असा लावलेला स्टिकर यावरुन सुरक्षारक्षकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी चौकशी करत त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये बंदूक, चाकू आणि विविध यंत्रणांची ओळखपत्रे आढळून आली.
पोलिसांनी त्याला अटक केली असून, कालीघाट पोलीस ठाण्यात एसटीएफ आणि विशेष शाखा त्याची कसून चौकशी करत आहे. त्याच्याकडे असलेल्या गाडीच्या मालकाचा शोध लागला आहे. दरम्यान, बॅनर्जी यांच्या निवासस्थानात शस्त्रधारी तरूण घुसल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.