अझरबैजानच्या हल्ल्याची भीती : पुतीनकडून मित्र देशाला धमकी
वृत्तसंस्था/ येरेवान
अझरबैजानचे सैन्य हजारोंच्या संख्येत पुन्हा आर्मेनियाच्या सीमेनजीक एकवटू लागले आहे. हे सैनिक स्वत:चे रणगाडे आणि अन्य शस्त्रास्त्रांवर एक विशेष पद्धतीचे चिन्ह तयार करत असल्याने ते हल्ला करण्याची तयारी करत असल्याचा संशय बळावला आहे. याचदरम्यान आर्मेनियाचा स्वत:चा जुना मित्र रशियावरील विश्वास डळमळीत झाला आहे. आर्मेनियाने आता रशियासोबत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावरून चर्चा सुरू केली आहे. आर्मेनियाच्या या निर्णयाला रशियाने विरोध केला असून ब्लादिमीर पुतीन यांच्या सरकारने धमकी दिली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
आर्मेनिया हा रशियाचा मित्र देश असला तरीही युक्रेनवरील हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध आता बिघडू लागले आहेत. गुन्हेगारी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात सामील होण्याच्या दिशेने पावले टाकणार असल्याचे आर्मेनियाने म्हटले आहे. तर आर्मेनियाने हा निर्णय घेतल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी रशियाने दिली आहे. अझरबैजानने नागार्नो काराबाखवर हल्ला केल्यावर रशियाने आर्मेनियाला मध्यस्थी कराराच्या अंतर्गत सुरक्षेचे आश्वासन दिले होते.
आर्मेनियात पोहोचले अमेरिकेचे सैनिक
रशिया युक्रेन युद्धात अडकून पडल्याने स्वत:च्या आश्वासनाची पूर्तता करणे त्याला अशक्य ठरले आहे. तर अझरबैजान सातत्याने भीषण हल्ले करत आहे. याचमुळे आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी आमचा देश रशियाच्या सुरक्षेच्या हमीवर विसंबून राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशिया या भागात कमकुवत होऊ लागताच अमेरिकेने आर्मेनियातील स्वत:ची भूमिका वाढविली आहे. अमेरिकेचे सैनिक आता आर्मेनियात शांतिरक्षक प्रशिक्षणाकरता पोहोचल्याने रशियाचे सरकार भडकले आहे.