हातबॉम्ब-दाऊगोळ्यासह स्वयंचलित शस्त्रे जप्त
वृत्तसंस्था /इम्फाळ
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता लष्कराकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. संशयितांवर कडक नजर ठेवण्याबरोबरच लूट करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम उघडण्यात आली आहे. 3 मे पासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे मणिपूरच्या वेगवेगळ्या भागात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. लष्करी जवान आणि पोलीस दलाने बुधवारपासून हाती घेतलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 29 शस्त्रे जप्त केल्याची माहिती लष्कराच्या स्पीयर कॉर्प्स विंगने ट्विटद्वारे दिली. जप्त करण्यात आलेली बहुतांश शस्त्रे ही स्वयंचलित शस्त्रे आहेत. त्याचबरोबर काही मोर्टार, हँड ग्रेनेड आणि युद्धाच्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात इम्फाळ पूर्वेतील पोरोम्पट आणि ककचिंग जिह्यातील सुगनू येथून एकूण 57 शस्त्रे, 318 दारूगोळे आणि पाच बॉम्ब जप्त करण्यात आल्याचे मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत एकूण 900 शस्त्रे आणि 11,518 राऊंड दारूगोळे हस्तगत केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 1 जून रोजी पत्रकार परिषदेत लोकांना शस्त्र समर्पण करण्याचे आवाहन केले. यानंतर बंडखोरांनी बरीच शस्त्रे पोलीस ठाण्यांमध्ये जमा केली आहेत. सध्या मणिपूरमधील काही भागात तणाव निवळल्यामुळे संचारबंदीची वेळ शिथील करण्यात आली आहे.