ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सिक्कीममध्ये भारतीय लष्कराच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील 16 जवानांना वीरमरण आले असून 4 जवान जखमी आहेत. उत्तर सिक्कीममधील झेमा येथे ही दुर्दैवी घटना घडली.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचा ट्रक सकाळी चतनहून थांगूच्या दिशेने निघाला होता. झेमाकडे जाताना एका तीव्र वळणावर लष्कराच्या तीन वाहनांपैकी एक ट्रक तीव्र उतारावरून घसरला. यात ट्रकमधील 16 जवानांना वीरमरण आले. तर चार जवान जखमी झाले आहेत.
दरम्यान, घटनास्थळी तत्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून, चार जखमी सैनिकांना एअर ऍम्बुलन्सने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वीरमरण आलेल्या जवानांमध्ये लष्कराचे तीन कनिष्ठ आयुक्त अधिकारी आणि 13 सैनिकांचा समावेश आहे.