कल्याणी ग्रुपकडून निर्मिती : ‘मेड इन इंडिया’ला अभूतपूर्व यश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात एक स्वयंचलित वाहन विकसित करण्यात आले असून विशेष आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेले हे मानवरहित ग्राउंड व्हेईकल (युजीव्ही) लवकरच भारतीय लष्करात समाविष्ट केले जाणार आहे. या साधनांचा वापर वाढल्यास यापुढे देशाच्या सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही सैनिकाची गरज भासणार नाही. सध्या युरोपातील अनेक देशांमध्ये ‘युजीव्ही’ हे विशेष वाहन सीमेच्या देखरेखीसाठी वापरले जात आहे. ‘युजीव्ही’ अनेक विशेष उपकरणांनी सुसज्ज असून याद्वारे सीमावर्ती भागात पाळत ठेवली जाईल.
‘युजीव्ही’ या सीसीटीव्ही आणि रिमोट नियंत्रित वाहनाद्वारे गरज भासल्यास सुमारे 350 किलो दारूगोळा आणि इतर स्फोटके किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू घटनास्थळी पोहोचवता येतात. हे वाहन भारतात बनवण्यात आले असून ‘मेड इन इंडिया’चे मोठे यश असल्याचे मानले जाते. भारतातच तयार करण्यात आलेले हे ‘युजीव्ही’ उपकरण 750 किलोपर्यंत शस्त्रे आणि दारूगोळा वाहून नेण्यास सक्षम आहे. कल्याणी ग्रुपकडून हे उपयुक्त वाहन बनवण्यात आले आहे. या मानवरहित वाहनाच्या सहाय्याने लष्कर कोणत्याही सैनिकाला पुढे न पाठवता जवळपास 10 किलोमीटर अंतरावरून सीमावर्ती भागात पाळत ठेवू शकते.