अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा नीट लक्ष देऊन ऐक, जे भक्त माझी भक्ती अत्यंत भक्तीभावाने करतात त्यांची चित्तशुद्धी होत जाते. त्यांच्यातील विकार मावळत जातात आणि ते राग, लोभ इत्यादि भावनांच्या पलीकडे जातात. साहजिकच प्रत्येक प्राणिमात्रातील ईश्वराचे त्यांना दर्शन होऊ लागते. त्यालाच आत्मदृष्टी असे म्हणतात. निजात्मदृष्टीमुळे सर्व भुतांच्या अंतरी त्यांना माझे दर्शन तर होतेच परंतु भुतांच्याबाहेरील सर्व सृष्टीतही त्यांना मीच दिसू लागतो. संपूर्ण चित्तशुद्धी झालेला माझा भक्त सर्वांभूती भगवद्भाव पाहू लागतो. त्यामुळे त्याला दिसताना जरी सर्व गोष्टी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी त्यामागील माझे अस्तित्व जाणवत असल्याने त्याला ती सर्व माझीच रूपे वाटू लागतात.
त्यामुळे त्याला कुणाचीही भीती वाटत नाही. सर्वतोपरी निर्भय असणे हे माझ्या भक्ताचे प्रमुख लक्षण आहे. उद्धवा तू अमाप भाग्याचा असून ज्ञाननिधी कैवल्यदीप असल्याने सर्वाभूती माझीच उपस्थिती असते ही गोष्ट तुला लगेच पटेल. अर्थातच माझी भक्ती करणाऱ्या नवख्या भक्ताला मी सांगतोय ही बाब लगेच पटणार नाही परंतु ह्याची फिकीर न करता सर्वाभूती माझी उपस्थिती असते ह्या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून जो माझी भक्ती करेल त्याचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. दिसायला माणसे वेगवेगळ्या रंगारुपाची दिसतात, त्यांची नावेही वेगवेगळी असतात. जगात असे फरक ठायीठायी असतात. माणसांप्रमाणे झाडेही अनेक प्रकारची असतात. त्यांची फुलेही विविध रंगांची असतात, फळेही वेगवेगळ्या चवीची असतात.
अशी ही सर्व सृष्टी वैविध्याने नटलेली आहे. असं जरी असलं तरी ह्या सगळ्या सृष्टीच्या मुळाशी मीच असतो परंतु अज्ञानामुळे ही गोष्ट सामान्य माणसांच्या लक्षात येत नाही. इतकेच काय मोठमोठे ऋषिमुनीही हे जाणू शकत नाहीत.
पण माझा भक्त माझ्याशी इतका एकरूप झालेला असतो की, मीच सर्व भुतांच्या रूपाने ह्या सृष्टीला सजवले आहे हे त्याने ओळखलेले असते. त्याला मात्र ह्या सगळ्यात माझे अस्तित्व स्पष्ट दिसत असते. त्यामुळे त्यातील वेगळेपण त्याच्या नजरेस येत नाही. मग लक्षात कसे येणार? त्यामुळे त्याला शत्रुमित्र सर्व सारखेच वाटत असतात. मी गीतेतील बाराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे तो कोणाचाही द्वेष करत नाही. सगळ्यांच्याबद्दल त्याच्या मनात दया आणि मैत्रीची भावना असते. त्याला कुणी काही बोलले किंवा कुणी त्याचा अपमान केला तरी तो त्यांना क्षमा करून टाकतो आणि त्या बळावर दु:ख सोसत असतो. हे सर्व माझी भक्ती त्याच्यावर प्रसन्न असल्याने घडत असते.
समजा माझा भक्त जेवायला बसला आहे आणि अचानक त्याच्या ताटातली पोळी एखाद्या कुत्र्याने पळवून नेली तर त्याला बिलकुल राग येत नाही कारण त्याला त्या कुत्र्यातही मीच दिसत असतो. साहजिकच देवाने कोरडी पोळी खाऊ नये म्हणून तो त्या कुत्र्याच्या रूपातील माझ्यामागे तुपाची वाटी घेऊन धावू लागतो. आता तू मला सांग जो सगळ्यात माझेच रूप पाहतो आणि सर्वत्र मलाच भजतो त्याच्यावर मी प्रसन्न होणार नाही का? अरे मी त्याच्यावर नुसताच प्रसन्न होत नाही तर एखाद्या घरगड्याप्रमाणे त्याचा आज्ञाधारी दासानुदास होतो.
त्याच्या तोंडून एखादी इच्छा व्यक्त व्हायचा अवकाश ती मी पूर्ण केली म्हणूनच समज. एव्हढेच काय नुसती त्याच्या मनात एखादी गोष्ट हवी असे आले तर ती मी त्याच्यासाठी लगेच हजर करायची तत्परता दाखवतो. पण गम्मत अशी की ह्या भक्ताने त्याचे मन आणि बुद्धी मला अर्पण केलेली असल्याने त्याला स्वत:ची अशी काही इच्छाच होत नाही. जे प्रारब्धानुसार वाटणीला आलेले असेल तेच तो गोड मानून घेतो. त्याचे हे मन आणि बुद्धी मला अर्पण करणे मला फार आवडते आणि मी त्याच्यावर अधिकच प्रेम करू लागतो.
क्रमश: