महात्मा गांधींचे खरे नाव मोहनदास करमचंद गांधी असे असले तरी त्यांचे खरे वडिल एक मुस्लिम जमिनदार असल्याचे खळबळजनक विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या सस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या या विधानावर आक्रमक झालेल्या कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पावसाळी अधिवेशात केली आहे.
अधिवेशनात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे नावाच्या गृहस्थाने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला कलम १५३ अंतर्गत अटक केली करा.” असे म्हणून गेली अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम संभाजी भिडे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर हा माणूस बाहेर कसा काय फिरू शकतो ? त्याच्या या विधानानंतर समाजात काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे ? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत या व्यक्तीला अटक केली पाहिजे,” अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेतली गेली आहे. या प्रकरणावर सरकारने योग्य ती कार्यवाई करावी.” असे निर्देश सरकारला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “या प्रकरणाची नोंद सरकारने घेतली असून योग्य चौकशी करून आवश्यक ती कार्यवाई करू,” असा विश्वास सभागृहाला दिला.
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जात असले तरी करमचंद गांधी हे महात्मा गांधी यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे.