ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी ही कारवाई केली.
सचिन भीमराव वाघमोडे (रा. लक्ष्मण टाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भिगवण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
पुणे ग्रामीण भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरु असताना सचिन वाघमोडे याने पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या प्रमाणपत्राबाबत बीड तहसील कार्यालयाकडून माहिती मागवली. त्यानुसार हे प्रमाणपत्र बीड तहसील कार्यालयातून देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वाघमोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.