नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यात 3 नवे विमानमार्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी रविवारी दिली. या राज्याच्या लोहित जिल्ह्यात विमानसेवेसंबंधी एका प्राधिकारणाचे निर्माणकार्य नुकतेच करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सिंदिया भाषण करीत होते.
अरुणाचल प्रदेशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे तीन नवे विमानमार्ग देण्यात येणार आहेत. यामुळे देशाच्या विविध भागांमधून, तसेच विदेशातूनही येथे मोठ्या संख्येने पर्यटक येऊ शकतील. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. गेली 60 वर्षे ईशान्येकडील 8 राज्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता हे अंतर भरुन काढण्यासाठी केंद्र सरकारने या भागाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यास प्रारंभ केला असून येथे अनेक महत्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यात आले. या भागातील जनतेची त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोय होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.