सूर्यप्रकाश वाढल्यानंतर दोन्ही उपकरणे आपोआप सक्रीय होण्याची आशा : जागे करण्याचे प्रयत्न तीव्र
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चांद्रयान-3 मोहिमेतील ‘विक्रम’ लँडर आणि ‘प्रज्ञान’ रोव्हर यांना जागे करण्यासाठी इस्रो सतत प्रयत्न करत आहे. तथापि, शनिवार 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत इस्रो रोव्हर आणि लँडरशी सिग्नल्सद्वारे संपर्क होऊ शकला नाही. तथापि, सिग्नल पाठवूनही संपर्काचा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरी मिशनवर परिणाम होणार नाही. कारण आतापर्यंत गोळा केलेला सर्व डेटा आणि माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती इस्रोने दिल्याने मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे.
चांद्रयान-3 चे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु तेथून कोणताही सिग्नल मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वी चंद्रावर रात्र असल्याने दोघांनाही स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले होते. दोन्ही स्लीप मोडमध्ये गेल्याने, मिशनचे 2 टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. इस्रो अजूनही संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असून जर संवाद साधला गेला तर मोहिमेचा तिसरा टप्पा येथून सुरू होईल. पुढील टप्प्यात अधिकची माहिती गोळा केली जाईल. तथापि, नजिकच्या काळात संपर्क होऊ शकला नाही तरी आपले मिशन पूर्णत: यशस्वी होते, असेही इस्रोने म्हटले आहे.
चंद्रावर रात्र झाल्यामुळे लँडर आणि रोव्हर दोन्ही स्लीप मोडवर ठेवण्यात आले होते. रात्री चंद्रावरील तापमान उणे 200 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. बॅटरी आणि रिचार्ज करण्यायोग्य उपकरणांना सूर्यप्रकाशाशिवाय कार्य करणे शक्य नव्हते. 20-21 सप्टेंबरपासून चंद्रावर सूर्योदय सुरू झाला. त्यानंतर इस्रोचे शास्त्रज्ञ लँडर आणि रोव्हर जागे होण्याची अपेक्षा करत आहेत. आता बॅटरी आणि इतर उपकरणे सूर्याच्या किरणांमुळे पूर्णपणे चार्ज होतील, त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधता येईल, असे इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी सांगितले.
मिशन चांद्रयान-3 चे काय होईल?
चंद्रावर सूर्य उगवला असला तरी प्रज्ञान आणि विक्रम अजून झोपेतून उठले नाहीत. मात्र, या दोघांना जाग आली नाही तर काय होईल, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चंद्र मोहीम अयशस्वी मानली जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे इस्रोने दिली असून या दोघांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले जाणार आहेत. आपल्याकडे अजून 15 दिवसांचा अवधी असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील दहा-पंधरा दिवसात सूर्याचा प्रकाश वाढत गेल्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान आपणच जागू शकतात, असेही इस्रोने स्पष्ट केले आहे.