विशेष सुरक्षा व्यवस्थेत कारागृहात रवानगी
लखीमपूर / वृत्तसंस्था
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा टेनी यांचा पुत्र आणि लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याने रविवारी सायंकाळी शरणागती पत्करली. शरणागतीनंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. सुरक्षा दक्षतेमुळे आशिष मिश्राची रवानगी स्वतंत्र बरॅकमध्ये केल्याची माहिती कारागृह अधीक्षक पी. पी. सिंग यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने आशिष मिश्रा यांचा जामीन फेटाळला होता. तसेच आठवडाभरात हजर राहण्यास सांगितले. न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी एक दिवस अगोदर रविवारी आशिषने रिमांड मॅजिस्ट्रेटसमोर आत्मसमर्पण केले.
लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीन यापूर्वी रद्द करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने एका आठवडय़ात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. उच्च न्यायालयाने पीडित पक्षाचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यांना घाईघाईत जामीन मंजूर करण्यात आल्याचा दावा सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने 18 एप्रिलला यासंबंधी निकाल दिला होता. दोन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाचा निर्णय आशिषच्या बाजूने आला होता, मात्र आता दोन महिन्यांनंतर अचानक चित्र बदलले आहे. मुख्य आरोपी म्हणून आशिष नाव समोर आल्यानंतर त्याचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा टेनी सतत त्याच्या बचावासाठी प्रयत्नशील होते.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी 4 एप्रिल रोजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणात आशिष मिश्रा याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या जामीन देण्याच्या निर्णयाला हिंसाचारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांनी आव्हान दिले होते. त्यापूर्वी आशिष मिश्रा चार महिने कोठडीत होता.