250 हून अधिक जणांचा पारंपरिक अस्त्रांनी हल्ला
वृत्तसंस्था/ शिलाँग
आसाम आणि मेघालय यांच्यातील सीमा वाद पुन्हा एकदा हिंसक झाला आहे. 26 सप्टेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील एका गावात पुन्हा संघर्ष झाला आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर धनुष्य-बाण आणि गुलेलद्वारे हल्ले करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हा संघर्ष मेघालयच्या पश्चिम जैंतिया हिल्स ज्ल्हि्यात अन् आसामच्या पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यादरम्यान सीमेवर स्थित लापांगप गावात झाला आहे. या घटनेत कुणी जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोन्ही राज्यांच्या पोलिसांकडून घटनास्थळाला भेट देण्यात आल्यावर तसेच स्थानिक लोकांची समजूत काढल्यावर स्थिती नियंत्रणात आली आहे. बुधवारी सकाळी स्थिती शांत परंतु तणावपूर्ण होती, कारण दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी ग्रामस्थांना संघर्ष झालेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री या प्रकरणी ऑक्टोबरमध्ये बैठक घेणार आहेत.
गावातील शेतकरी स्वत:च्या पिकांची देखभाल करत असताना शेतांनजीक लपलेल्या आसामच्या लोकांनी गुलेल आणि धनुष्यबाणांनी हल्ला केला. हल्ल्याविषयी कळल्यावर आमच्या गावातील सुमारे 300 लोक एकत्र आले आणि त्यांनी आसामींना प्रत्युत्तर दिले, यामुळे मंगळवारी तणाव निर्माण झाला होता असे लापांगम गावातील रहिवाशांनी सांगितले आहे.
आसाम-मेघालय सीमेवर अशाप्रकारच्या हिंसक घटना सातत्याने घडत असतात. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये सीमेवर एका वादग्रस्त जमिनीवरून झालेल्या गोळीबारात मेघालयाचे 5 वनरक्षक तर आसामच्या एका वनरक्षकाचा मृत्यू झाला होता. सीमेला लागून असलेल्या जंगलातून काही लोक लाकूड पळवून नेत होते. आसाम पोलीस आणि वन विभागाने त्यांना पश्चिम जैंतिया हिल्सच्या मुकरोह येथे रोखल्यावर गोळीबार सुरू झाला होता. या घटनेनंतर मेघालयाच्या 7 जिल्ह्यांमध्ये हिंसा भडकली होती. आसाम आणि मेघालय दरम्यान 884 किलोमीटर लंब सीमेच्या 12 हिस्स्यांवरून वाद आहे.