पुणे / वार्ताहर :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यानासाठी केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक उद्यान निरीक्षकासह उपलेखपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण अर्जुन मांजरे (वय 46) व उपलेखापाल संजय देवराम काळभोर (56) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7,7 अ, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 47 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कॉन्ट्रक्टर आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यानासाठी केलेल्या देखभालीच्या कामाचे बील मंजूर करण्यासाठी सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांनी तक्रारदारांकडे 17 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली. एसबीने तक्रारीची पडताळणी केली असता किरण मांजरे व संजय काळभोर या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांना लाच स्वीकारत असताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून अटक केली. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.