अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, मला पूज्य व्यक्तींचे चरण हृदयात धरून ठेवावेसे वाटतात पण माझ्या भक्ताला वंद्य आणि निंद्य अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींमध्ये माझेच स्वरूप दिसत असते. वेदाभ्यास करणारा साधक वेदात सांगितल्याप्रमाणे, माणसामाणसात फरक करत बसेल तर माझा एकनिष्ठ भक्त प्रत्येक भूतात असलेले माझे अस्तित्व लक्षात घेईल. त्यामुळे त्याला सर्व माझीच रूपे आहेत असे वाटल्याने भूताभूतात भेद करावासा वाटणारच नाही कारण सगळ्यात एकच आत्मतत्व आहे ही गोष्ट तो लक्षात घेतो. उद्धव म्हणाला, देवा एकच आत्मतत्व सर्वात असते हे मला समजले पण म्हणून सर्व भुते ही तुझीच रूपे आहेत हे मला अजून नीटसे समजलेले नाही. ते नीट समजण्यासाठी मला आणखीन काही उदाहरणे देऊन ही गोष्ट उलगडून सांगा. भगवंत म्हणाले, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. हा विषय तसा खरोखरच गहन आहे. तो तुला नीटपणे कळावा म्हणून मी तुला आणखीन काही उदाहरणे सांगतो. प्रथम हे लक्षात घे की, वस्तुत: हजर असलेले आत्मतत्व त्या वस्तूला तिचे गुणधर्म प्रकट करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती पुरवते. उदाहरणार्थ सूर्य आणि काजवा ह्यांच्या आकारात आणि प्रकाशात खूपच फरक असतो. सूर्याचा प्रकाश प्रखर असतो तर काजव्याचा प्रकाश मिणमिणता असतो. असं जरी असलं तरी त्यातील आत्मतत्वाबद्दल बोलायचं झालं तर त्याचं स्वरूप सारखंच असतं आणि ते त्या दोघांनाही प्रकाश देण्यासाठी आवश्यक तितकी शक्ती पुरवत असतं. दावाग्नी आणि दिवा ही दोन्हीही तेजाची रूपे आहेत परंतु दावाग्नि एव्हढा तेज:पुंज असतो की, त्याला पाण्यातच ठेवावं लागतं, जर त्याला पाण्याबाहेर काढलं तर त्याचं तेज बिलकुल सहन होत नाही. त्याउलट दिवा सौम्यपणे तेवत असतो. दोघांच्या तेजात जमीनअस्मानाचा फरक असला तरी उभयतात आत्मतत्व एकच असते. उद्धवा, अशी एक काय अनेक उदाहरणे देता येतील. असं बघ की कापूर पेटवला तर तो शांत सोज्वळपणे जळत असतो पण समज त्यात जर मोहऱ्या टाकल्या तर त्या तडतडू लागतात. त्याप्रमाणे काही लोकांच्या स्वभावात सत्वगुण अधिक असतो तर काहींच्या स्वभावात तमोगुणाचे आधिक्य असते. सत्वगुणी माणसाचा स्वभाव शांतीप्रिय असतो तर तमोगुणी मनुष्य कुणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याच्या मनाविरुद्ध कुणी काही वागले किंवा बोलले की, त्याला चटदिशी राग येतो. असे स्वभावात भेद असू शकतात पण स्वभाव वेगवेगळे असलेल्या माणसांच्यात आत्मतत्व एकच असते हे लक्षात घे. एखाद्या मनुष्याच्या स्वभावानुसार त्याला अडचणीत सापडलेल्याला मदत करायची तीव्र इच्छा असते. काहीवेळा अपघातात सापडलेल्या माणसांचे प्राण वाचवण्याचे कार्यही त्याच्या हातून होते. तर ह्याच्याउलट एखादा मनुष्य इतका कृतघ्न असतो की, प्राणदात्याला ठार मारायलाही तो मागेपुढे पहात नाही. माझ्या भक्ताला जरी ह्या दोन भिन्न स्वभावांची ओळख असली तरीही तो सज्ञानी असल्याने दोघांच्यात आत्मतत्व एकच आहे ह्या जाणीवेने कोणताही भेद करत नाही. हे झालं माणसांच्याबाबतीत. आता झाडाकडे पहा त्याचा जो प्रतिपाळ करतो आणि जो त्याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालतो त्या दोघांनाही तो सारखीच फळेफुले देतो. तसंच माझ्या भक्ताचं वर्तन असतं त्याला दुनियेतल्या गोष्टींच्याबाबतीतील भल्याबुऱ्याशी काहीही देणेघेणे नसते. त्याला केवळ मीच सर्वत्र भरून राहिलेला दिसत असल्याने, त्याच्या दृष्टीने हे सर्व विश्व मिथ्या असते. ते जरी नजरेला दिसत असले तरी त्याला ते निरर्थक वाटते. मग भले काय, बुरे काय त्याला त्याच्याशी काही देणेघेणेच नसते. समोरच्या व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती त्याला निरर्थक वाटत असल्याने त्यांच्यापैकी काही गोष्टीपासून आपल्याला अपाय होईल असे त्याच्या मनातही येत नाही कारण तो त्याठिकाणी माझेच अस्तित्व पहात असतो.
क्रमश: