सैन्याशी संबंधित माहिती पुरविल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ लखनौ
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी भारतीय सैन्याची हेरगिरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला उत्तरप्रदेश एटीएसने लखनौ येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपीचे नाव शैलेंद्र कुमार उर्फ शैलेंद्र सिंह असे नाव आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून त्याने आयएसआयला सैन्याशी निगडित माहिती पुरविली होती. शैलेशने जवळपास 8-9 महिन्यांपूर्वी भारतीय सैन्यात पोर्टर म्हणून काम केले होते. यामुळे सैन्याशी निगडित महत्त्वाची माहिती त्याच्याकडे होती.
शैलेश हा वर्तमानात सैन्यात कार्यरत नव्हता. तरीही सोशल मीडिया प्रोफाइलवर त्याने सैन्यात कार्यरत असल्याचे नमूद केले होते. शैलेश हा फेसबुकच्या माध्यमातून हरलीन कौर नावाच्या आयडीच्या संपर्कात आला होता. शैलेशचे अन्य आयएसआय हँडलर प्रीतिसोबत देखील व्हॉट्सअॅपवर ऑडिओ कॉलच्या माध्यमातून बोलणे व्हायचे. प्रीतिला देखली शैलेशने आपण सैनिक असल्याचे सांगितले होते. शैलेशने पैशांकरता सैन्याशी निगडित महत्त्वाची माहिती प्रीतिला पुरविली होती.