वंटमुरी येथील प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
कोल्हापूर येथील धरणे आंदोलन संपवून बेळगावला येणाऱ्या वाहनांना कर्नाटक पोलिसांनी लक्ष्य केले. भगवे झेंडे लावलेली वाहने वंटमुरी गावानजीक अडविली गेली. यामुळे संतापलेल्या मराठी भाषिकांनी रस्ता अडविल्याने पोलिसांनी वाहनांना वाट मोकळी करून दिली.
मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनासाठी शेकडोंच्या संख्येने सीमावासीय कोल्हापूरला गेले होते. हेच चित्र डोळ्यात खुपल्याने कर्नाटक पोलिसांनी परतीच्या मार्गावर असलेल्या वाहनांना लक्ष्य केले. भगवे ध्वज असणारी वाहने अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात होती. 6 ते 7 वाहने अडविल्याने अखेर मराठी भाषिकांनी पोलिसांविरोधात घोषणा देत राष्ट्रीय महामार्ग अडविला. यामुळे पोलिसांनी माघार घेत वाहनांना वाट मोकळी करून दिली.
गणबैल येथेही चौकशी
खानापूर येथून कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांना गणबैल येथे अडविण्यात येत होते. वाहनांचे क्रमांक नोंदवून वाहनांमध्ये कोण आहेत, त्यांची नावे घेतली जात होती. यामुळे सीमावासियांमधून संताप व्यक्त होत होता. कर्नाटकात सोडा पण महाराष्ट्रात आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्यांवरही दडपशाही केली जात असल्याने नाराजी व्यक्त होत होती.