महाबळेश्वर : महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मस्जित रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरटय़ाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या परिसरात अशा प्रकारे एटीएम फोडण्याचे प्रयत्न होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर बाजारपेठेत गणेश विसर्जनाची धामधूम सुरु होती. येथील सुभाषचंद्र बोस चौकातून मिरवणुकीस प्रारंभ होतो तर छ शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचा समारोप होतो. या मिरवणूका छ शिवाजी महाराज चौकाकडे पोचल्यानंतर शनिवारी पहाटे दोन वाजता एका अज्ञात चोरटय़ाने मस्जित रोडवरील स्टेट बँक एटीएममध्ये प्रवेश केला. यावेळी चोरटय़ाने जिन्सची पॅन्ट लाल टीशर्ट परिधान करून रुमालाचा साहाय्याने चेहरा झाकला होता या एटीएम केंद्रात एकूण चार मशीन असून, त्यापैकी एटीएमच्या दारातच असलेल्या पहिल्या मशीनचा चोरटय़ाने कटावनीने पुढील भाग उघडून एटीएम मशीन फिडण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयन्त करूनही एटीएम मधील रक्कम चोरटय़ाच्या हाती लागली नाही. कुणीतरी एटीएम येत असल्याची कुणकुण लागल्याने तो तेथून पसार झाला. याच दरम्यान एटीएम मधून आवाज आल्याने बँकेच्या सुरक्षारक्षकाने खिडकीमधून डोकावून पहिले असता काही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
अधिक वाचा : आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट मेसेज पाठवून एक काेटींचा गंडा
शनिवारी सकाळी बँकेच्या व्यवस्थापकांना सुरक्षारक्षकाने एटीएम मशीनचा पुढील दरवाजा उचकटला असल्याचा प्रकार व्यवस्थापकांना सांगितला. त्यानंतर तातडीने बँक व्यवस्थापकांनी एटीएममध्ये जाऊन पाहणी केली असता एका मशीनचा पुढील लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसला. परंतु आतील डिजिटल लॉक सुरक्षित असून चोरी झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुद्ध तक्रार दाखल केली. बँकेच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आज दिवसभर महाबळेश्वर पोलिसांनी स्टेट बँक एटीएम व या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिले असता आढळून आलेल्या संशयितांची चौकशी देखील सुरु केली आहे.