वृत्तसंस्था/ लखनौ
सध्या गाजत असलेल्या उत्तर प्रदेशातील लुलू मॉल प्रकरणी कठोर कारवाई करण्याचा निर्धार उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केला आहे. या मॉलचे उद्घाटन 8 जुलैला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. गेल्या बुधवारी या मॉलमध्ये नमाज पडला जात असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. यामुळे उत्तर प्रदेशातील हिंदू संघटना संतप्त झाल्या असून त्यांनी शुक्रवारी या मॉलमध्ये हनुमान चालिसा पडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर गोंधळ उडाला. तथापि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
लुलू मॉल हा सरकारी आणि खासगी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने निर्माण करण्यात आला आहे. या मॉलचे व्यवस्थापक समीर वर्मा यांनी मॉलमध्ये नमाज पडण्याच्या घटनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. नमाजाचा कार्यक्रम व्यवस्थापनाच्यावतीने आयोजित करण्यात आला नव्हता. मॉलचा उपयोग धार्मिक कारणांसाठी केला न जाण्याचा नियम असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.