2-1 फरकाने मालिका भारताकडे, मार्शचे शतक हुकले, वॉर्नर, स्मिथ, लाबुशेन यांची अर्धशतके, सामनावीर मॅक्सवेलचे 4 बळी
वृत्तसंस्था/ राजकोट
येथे झालेल्या तिसऱ्या व शेवटच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार फलंदाजी व भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारताचा 66 धावांनी पराभव करून पाच सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली. 40 धावांत 4 बळी टिपणाऱ्या मॅक्सवेलला सामनावीर तर भारताच्या शुभमन गिलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन व डेव्हिड वॉर्नर यांनी नोंदवलेल्या शानदार अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 352 धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या जसप्रित बुमराहने 3 बळी मिळविले. त्यानंतर भारताचा डाव 49.4 षटकांत 286 धावांत गुंडाळून विजय साकार केला. मात्र भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
भारताला रेहित शर्मा व वॉशिंग्टन सुंदर यांनी 74 धावांची जलद सलामी दिली. सुंदर 11 व्या षटकात 18 धावांवर बाद झाल्यानंतर रोहित व कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. रोहितने आक्रमक फटकेबाजी करीत 57 चेंडूत 5 चौकार, 6 षटकारांसह 81 धावा झोडपल्या तर कोहलीने 61 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 56 धावा जमविल्या. पण जोडी फुटल्यानंतर भारताची मधली फळी दडपणाखाली कोलमडली आणि 2 बाद 171 अशा स्थितीनंतर ठरावीक अंतराने गडी बाद होत गेले आणि शेवटच्या षटकांत त्यांचा डाव 286 धावांत आटोपला. ऑफस्पिनर मॅक्सवेलने 40 धावांत 4 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
वॉर्नर-मार्शची टोलेबाजी
वर्ल्ड कपआधीच्या शेवटच्या अधिकृत वनडे सामन्यात मार्शचे शतक थोडक्यात हुकले असले तरी त्यांच्या पहिल्या चार फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. डेव्हिड
वॉर्नरने जोरदार टोलेबाजी करीत 34 चेंडूत 6 चौकार, 4 षटकारांसह 56 धावा फटकावत संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. स्मिथनेही खराब फॉर्मला
ब्रेक लावत जलद 74 धावा फटकावल्या. त्याने 61 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार मारला. लाबुशेनने धावांची गती वाढवताना 58 चेंडूत 72 धावा टोलवत या कॅलेंडर वर्षात ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावा नोंदवल्या.
प्रथम फलंदाजी निवडल्यावरऑस्ट्रेलियन फलंदाजांना हवामानाचा बराच त्रास झाला. मात्र त्यांनी यावेळी आक्रमक धोरण कायम ठेवत मोठी धावसंख्या रचली. मार्शने बुमराहला बराच चोप दिला. त्याच्या 10 षटकांत एकूण 81 धावा निघाल्या तर वॉर्नरने
सिराजला दोन षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. प्रसिद्ध कृष्णालाही त्याच्या पहिल्या षटकात 3 चौकार, 1 षटकार मारला.
वॉर्नरने भारताविरुद्ध नववे व एकंदर 31 वे अर्धशतक सिराजला फाईनलेगला षटकार ठोकत पूर्ण केले. प्रसिद्ध कृष्णाला स्कूप करताना तो बाद झाला.
23 व्या षटकांत बुमराहला पुन्हा आणल्यानंतर मार्शने त्याला 3 चौकार, 2 षटकार ठोकल्यानंतर रोहितने कुलदीपला गोलंदाजीस आणले. स्मिथ व मार्श यांनी दुसऱ्या गड्यासाठी 119 चेंडूत 137 धावांची भागीदारी केली. मार्श या वर्षात दुसऱ्यांदा शतक नोंदवण्यापासून वंचित राहिला. कुलदीपच्या गोलंदाजीवर तो 96 धावांवर बाद झाला. त्याने 84 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार, 3 षटकार मारले. नंतर सिराजने स्मिथला 74 धावांवर पायचीत केले. त्यानंतर अॅलेक्स कॅरे 11, मॅक्सवेल
5, ग्रीन 9 धावा काढून बाद झाले तर कर्णधार कमिन्स 19 धावांवर नाबाद राहिला. बुमराहने 3, कुलदीपने 2, सिराज व कृष्णा यांनी एकेक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 7 बाद 352 : वॉर्नर 34 चेंडूत 56, मार्श 84 चेंडूत 96, स्मिथ 61 चेंडूत 74, लाबुशेन 58 चेंडूत 72, कॅरे 11, मॅक्सवेल 5, ग्रीन 9, कमिन्स नाबाद 19, अवांतर 9. गोलंदाजी : बुमराह 3-81, कुलदीप 2-48, सिराज 1-68, कृष्णा 1-45.
भारत 49.4 षटकांत सर्व बाद 286 : रोहित 57 चेंडूत 81, सुंदर 18, कोहली 61 चेंडूत 56, श्रेयस अय्यर 43 चेंडूत 48, राहुल 30 चेंडूत 26, सूर्यकुमार 8, जडेजा 36 चेंडूत 35, अवांतर 6. गोलंदाजी : मॅक्सवेल 4-40, हॅझलवुड 2-42, ग्रीन 1-30, तन्वीर सांघा 1-61, कमिन्स 1-59, स्टार्क 1-53.