महेंद्र पराडकर
पॕट कमिन्सच्या नेतृत्वाखालील आॕस्ट्रेलियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वविजेतेपदाचा षटकार लगावला. तब्बल सहावेळा विजेतेपदाला गवसणी घालत अंतिम सामना कसा खेळायचा असतो हे कांगारुनी पुन्हा एकदा क्रिकेट जगताला दाखवून दिले. पूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजानी अंतिम सामन्यात मात्र कच खाल्ली. गोलंदाजीसुद्धा निष्प्रभ ठरली. दहाव्या षटकानंतर सुरू झालेली अती सावध फलंदाजी भारतासाठी घातक ठरली. संपूर्ण स्पर्धेत धावांचा रतीब घालणाऱ्या भारतीय फलंदाजांना २४० धावांपर्यंतच मजल मारता आली. वर्ल्ड टेस्ट चॕम्पियनशिच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला ट्व्हिस हेड ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्येही भारताची डोकेदुखी ठरला. त्याने अंतिम सामन्यात शानदार शतक ठोकत श्रीलंकेच्या अरविंद डिसिव्हाची आठवण करून दिली.