विश्व करंडक महिलांची फुटबॉल : फ्रान्स, कोलंबियाचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था/ ब्रिसबेन (ऑस्ट्रेलिया)
2023 सालातील फिफाच्या विश्व करंडक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत सहयजमान ऑस्ट्रेलियाने शनिवारी झालेल्या थरारक सामन्यात फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उपांत्यफेरीत स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 7-6 अशा गोलफरकाने पराभव केला. तसेच शनिवारी सिडनीमध्ये खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात इंग्लंडने कोलंबियाचा 2-1 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला. आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात येत्या बुधवारी सिडनीमध्ये उपांत्य सामना खेळविला जाईल.
ऑस्ट्रेलियन महिला फुटबॉल संघाने शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले. तर फ्रान्सनेही ऑस्ट्रेलियाला आपल्या दर्जेदार खेळाने चोख प्रत्युत्तर दिले. या सामन्यात निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत तसेच त्यानंतर पंचांनी दिलेल्या जादा कालावधीत दोन्ही संघ गोलशुन्य बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. या सामन्याला सुमारे 50 हजार शौकीन उपस्थित होते. ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक मॅकेन्सी अरनॉर्डने पेनल्टी शूटआऊटवरील फ्रान्सच्या दोन फटके अडविल्याने फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आले. पेनल्टी शूटआऊट प्रक्रियेमध्ये व्हिकी बेचोने फ्रान्सच्या 10 व्या फटक्यावर गोल करण्याची संधी गमविली. तर ऑस्ट्रेलियाच्या व्हिनेने निर्णायक फटका मारून आपल्या संघाला उपांत्यफेरीत स्थान मिळवून दिले. फ्रान्सने पेनल्टी शूटआऊट प्रक्रियेमध्ये राखीव गोलरक्षक सोलेनी ड्युरँडकडे गोलरक्षणाची जबाबदारी सोपविली. यापूर्वी फ्रान्सच्या महिला संघाने या स्पर्धेत 2011 साली उपांत्यफेरी गाठली होती. पण यावेळी त्यांना ऑस्ट्रेलियाने रोखले. पेनल्टी शूटआऊट प्रक्रियेवेळी ऑस्ट्रेलियाने सॅम केरला राखीव म्हणून बेंचवर बसविले होते. कारण त्यांची कर्णधार मॅटीलडेस ही दुखापतीतून पूर्णपणे बरी झाली होती. तिने या सामन्यात पूर्वार्धामध्ये मैदानात प्रवेश केला नाही. पण उतरार्धात तिने पेनल्टी शूटआऊटमध्ये आपला सहभाग दर्शविला.
या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कविरुद्ध खेळलेल्या संघामध्ये कोणताही बदल केला नाही. तर फ्रान्सने मॅली लेक्रारला बचावफळीसाठी संधी दिली होती. सामना सुरू झाल्यानंतर लेक्रारने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. पण तिचा फटका गोलपोस्टच्या बाहेरून गेल्याने फ्रान्सला खाते उघडता आले नाही. फ्रान्सने पहिल्या 20 मिनिटामध्ये वेगवान खेळ आणि आक्रमक चालीवर अधिक भर दिल्याने ऑस्ट्रेलियावर चांगलेच दडपण आले होते. 41 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाची गोल करण्याची संधी थोडक्यात हुकली. मध्यंतरावेळी गोलफलक कोराच राहिला. सामन्याच्या उत्तरार्धात 10 व्या मिनिटाला इगमंडच्या जागी सॅम केर मैदानात आली. ऑस्ट्रेलियन संघातील केर ही अव्वल फुटबॉलपटू म्हणून ओळखली जात असल्याने प्रेक्षकांनी तिचे जोरदार स्वागत केले. 60 व्या मिनिटाला केरने फ्रान्सच्या गोलपोस्ट दिशेने मारलेला फटका फ्रान्सच्या गोलरक्षकांने थोपविला. निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ गोलशुन्य बरोबरीत राहिल्याने पंचांनी जादा वेळेचा अवलंब केला. या कालावधीतही फ्रान्सच्या कारपेंटरने आपल्या संघाच्या गोलपोस्टमध्ये नजरचुकीने चेंडू लाथाडला. पण या सामन्यातील चिलीच्या पंचांनी हा फटका फाऊल म्हणून ठरविल्याने पुन्हा गोलकोंडी कायम राहिली.
पेनल्टी शूटआऊटला प्रारंभ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची गोलरक्षक मॅकेन्सी आरनॉर्डने फ्रान्सच्या बेचोचा फटका उजवीकडे झेपावत अडविला. त्यानंतर फोर्डने पहिल्या फटक्यावर ऑस्ट्रेलियाचा पहिला गोल केला. त्यानंतर स्टेप कॅटेलीने ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआऊटमधील दुसरा फटका चुकविला. रेनार्दने फ्रान्सचा दुसरा फटका मारून आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या केरने गोल नोंदवून पुन्हा आपल्या संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ली सोमेरने अचूक गोल नोंदवून फ्रान्सला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मेरी फॉलेरने पुन्हा ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. ऑस्ट्रेलियाच्या अरनॉर्डने फ्रान्सचे दोन फटके अडविले. दोन्ही संघ 6-6 असे बरोबरीत राहिल्यानंतर फ्रान्सचे दोन फटके अरनॉर्डने पुन्हा थोपविले. क्लेरी हंटचा फटका चुकल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या काँटेनी व्हिनेने 10 व्या पेनल्टी फटक्यावर निर्णायक गोल नोंदवून फ्रान्सचे आव्हान 7-6 असे संपुष्टात आणले. पंचांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना 10 पेनल्टी फटके दिले होते.