वृत्तसंस्था/ लंडन
जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताकडून कुठल्या प्रकारचा मारा होईल आणि कुठल्या गोलंदाजांना तोंड द्यावे लागेल याविषयी ऑस्ट्रेलियन संघ साशंक असून रवींद्र जडेजाला भारताच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता त्यांना वाटत आहे. परंतु 7 जूनपासून ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संधी मिळेल की नाही याविषयी ते साशंक आहेत.
भारताने नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर चषक मालिकेत तीन फिरकीपटूंचा वापर केला होता आणि त्यात अश्विन (25 बळी) व जडेजा (22 बळी) या दोघांनीही चमकदार कामगिरी करून भारतीय संघाला 2-1 ने मालिका जिंकण्याकामी मोलाची मदत केली होती. गुऊवारी बेकनहॅममधील केंट काउंटी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या सराव सत्रापूर्वी स्थानिक माध्यमांशी बोलताना साहाय्यक प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी म्हणाला की, संघ व्यवस्थापनाने भारताचा मारा नेमका कसा असू शकतो यावर बरीच चर्चा केली आहे. मला वाटते की, जडेजा खेळेल कारण तो फलंदाजीत योगदान देऊ शकतो आणि तो सहाव्या क्रमांकावर यशस्वी झाला आहे, याकडे त्याने लक्ष वेधले.
मग प्रश्न हा चौथा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या रूपाने घ्यायचा की, अश्विनच्या रूपाने अष्टपैलू खेळाडू निडायचा हा असेल. ते दोघेही खूप चांगले पर्याय आहेत, असे मत व्हिटोरीने व्यक्त केले. अश्विनने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केलेली असूनही त्याला स्थान न मिळता राहू शकते, असे त्याने सांगितले. या अनुभवी ऑफस्पिनरने इंग्लंडमधील सात सामन्यांत 28.11 च्या सरासरीने एकूण 18 बळी घेतलेले आहेत. परंतु तो ओव्हलवर फक्त एक कसोटी खेळलेला आहे.
अश्विन हा खूप चांगला गोलंदाज आहे आणि तो बहुतेक संघांसाठी पहिली पसंती राहील. पण संघ रचनेमुळे त्याची निवड न होता राहू शकते. ओव्हलवरील खेळपट्टी नेहमी असते तशीच असेल अशी आमची अपेक्षा आहे. ही खेळपट्टी चांगली आहे. परंतु खेळ जसजसा पुढे सरकेल तसतशी ती फिरकीपटूंना खूप मदत देऊ शकते, असे निरीक्षण व्हिटोरीने व्यक्त केले. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमधील शानदार प्रदर्शनानंतर कॅमेरून ग्रीनकडून अंतिम सामन्यात मोठी भूमिका बजावली जाण्याची अपेक्षा व्हिटोरीने ठेवली आहे. कोणत्याही क्रिकेटसाठी सध्या तयारी करावी लागते. ग्रीनवरील गोलंदाजीचा भार वाढला आहे आणि तो कसोटी क्रिकेटसाठी सज्ज होत आहे, असे त्याने सांगितले.