15 सदस्यीय संघाची घोषणा : पॅट कमिन्सकडे नेतृत्वाची धुरा : कॅमरुन ग्रीन, सीन अॅबॉटला संधी
वृत्तसंस्था/ सिडनी
आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघ झटपट आपला 15 सदस्यीय संघ घोषित करत आहेत. 5 सप्टेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी आपला संघ जाहीर केला होता. आता यामध्ये आणखी एका संघाचा समावेश झाला आहे. बुधवारी (दि. 6 सप्टेंबर) बलाढ्या ऑस्ट्रेलियानेही 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज मार्नस लाबूशेनला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे. तसेच, कॅमरुन ग्रीन हा पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.
मागील महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक संघात 18 खेळाडूंचा समावेश होता, परंतु आता ती संख्या कमी करण्यात आली आहे. अॅरॉन हार्डी, नॅथन एलिस आणि तन्वीर संघा यांना या 18 सदस्यांच्या संघातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे वर्ल्डकप दरम्यान पॅट कमिन्स नेतृत्व करणार असून त्याला वेगवान गोलंदाज जोस हॅजलवूड आणि मिचेल स्टार्क यांची सोबत मिळणार आहे. सीन अॅबॉट याला राखीव ठेवण्यात आले आहे. अॅबॉटला आपला पहिला विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच संघात अॅश्टन अॅगर आणि अॅडम झाम्पा या दोन फिरकी गोलंदाजांचा देखील असणार आहे.
स्मिथ, वॉर्नर, मिचेल मार्श सारखे तगडे फलंदाज
वर्ल्डकपमध्ये फलंदाजीची धुरा स्टीव्ह स्मिथवर असणार आहे. याशिवाय, ग्लेन मॅक्सवेल, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, मार्क स्टोनिस, डेविड वॉर्नर, कॅमरुन ग्रीन यांच्यावरही विश्वचषक स्पर्धेत संघाची ‘नैय्या पार’ करण्याची जबाबदारी असणार आहे. मिचेल मार्श सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तसेच, त्याने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या गेलेल्या टी-20 मालिकेत फलंदाजीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. अॅलेक्स कॅरी आणि जोस इंग्लिस हे दोघे संघासाठी यष्टिरक्षक म्हणून काम करतील.
सध्या ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. यानंतर ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात जाणार आहेत. या मालिकेचा पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. तसेच, दुसरा सामना 24 आणि अखेरचा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. ही मालिका आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना भारताविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये होईल.
वनडे वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोस इंग्लिस, ट्रेविस हेड, अॅश्टन अॅगर, जोस हॅजलवूड, कॅमरुन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्क स्टोनिस, डेविड वॉर्नर, अॅडम झम्पा, मिचेल स्टार्क, सीन अॅबॉट.
कमिन्स, स्मिथ, मॅक्सवेल दुखापतग्रस्त
विश्वचषक स्पर्धा तोंडावर आली असताना ऑस्ट्रेलियन संघाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीला समोर जावे लागत आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांची विश्वचषकासठी निवड झालेली आहे. परंतू ते सध्या दुखापतग्रस्त आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. संघाचा कर्णधार हाच सध्या दुखापतग्रस्त आहे. तर ग्लेन मॅक्सवेलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच सराव करत असतना त्याला दुखापत झाली. तो कधीपर्यंत बरा होईल हे अजून सांगता येणार नाही. तसेच स्टार फलंदाज स्टीव्हन स्मिथ देखली जखमी आहे. तसेस कांगारुचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा ही अनेक दिवसांपासून दुखापतीच्या कारणाने संघाबाहेर आहे. विश्वचषकासाठी संघ निवडला आहे खरा पण हे दिग्गज खेळाडू कधीपर्यंत बरे होतील हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलेले नाही.