वृत्तसंस्था/ टाऊन्सव्हिले, ऑस्ट्रेलिया
मिशेल स्टार्क व ऍडम झाम्पा यांनी मिळविलेल्या प्रत्येकी 3 बळींच्या आधारे ऑस्ट्रेलियाने येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 8 गडय़ांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱयासमोर 27.5 षटकांत केवळ 96 धावांत त्यांचा धुव्वा उडाला. सिकंदर रझाने सर्वाधिक 17, कर्णधार रेगिस चकबवाने 10 धावा जमविल्या. स्टार्कने 24 धावांत 3 तर झाम्पाने 21 धावांत 3 बळी मिळविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 14.4 षटकांत 2 बाद 100 धावा जमवित आरामात विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही बळी रिचर्ड नॅगेव्हाने मिळवेले. वॉर्नरने 13, कर्णधार ऍरोन फिंच 1 धाव काढून बाद झाले. स्मिथ (नाबाद 47) व ऍलेक्स कॅरे (नाबाद 26) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. शेवटचा सामना याच ठिकाणी शनिवारी होणार आहे.