ब्रिटनपेक्षा तीन पट अधिक भूभाग पाण्याखाली ः कांगारूही त्रस्त
वृत्तसंस्था / सिडनी
ऑस्ट्रेलियाचा किंबरली भाग 100 वर्षांमधील सर्वात भीषण पुराला सामोरा जात आहे. किंबरलीचे क्षेत्रफळ ब्रिटनच्या तुलनेत तीनपट अधिक असले तरीही लोकसंख्या कमी आहे. येथे राहणारे बहुतांश लोक हे आदिवासी आहेत. या विशाल क्षेत्रात चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होत अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पुरामुळे कांगारूही मोठय़ा संख्येत प्रभावित झाले आहेत.
किंबरलीमध्ये पुरात अडकलेल्या शेकडो लोकांना सैन्याच्या हेलिकॉप्टर्सद्वारे एअरलिफ्ट करण्यात आले आहे. या भागात सर्वत्र पाणीच पाणी आहे. काही भागांमध्ये पाणी 50 किलोमीटरपर्यंत फैलावलेले असल्याचे उद्गार ऑस्ट्रेलियाच्या आपत्कालीन सेवांचे मंत्री स्टीफन डावसन यांनी काढले आहेत.
पंतप्रधान एंथोनी अल्बनीज यांनी पूरसंकटाला भयावह ठरविले आहे. पूरग्रसत लोकांना शक्य ती सर्व मदत सरकार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कित्येक महिने लागणार असल्याचे अधिकाऱयांचे सांगणे आहे.
किंबरलीच्या फिट्जरॉय क्रॉसिंग टाउनचा पुरामुळे अन्य भागांशी असलेला संपर्क तुटला आहे. फिट्जरॉय नदीत पाण्याची पातळी 15.81 मीटरपर्यंत पोहोचलीआहे. याचमुळे येथे हेलिकॉप्टरद्वारे आवश्यक सामग्री पोहोचविण्यात येत आहे. 200 हून अधिक लोकांना एअरलिफ्ट करत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वायुदलाची विमाने तसेच चिनूक हेलिकॉप्टर्स बचाव अन् मदतकार्यात सामील झाली आहेत.