..अखेरच्या सत्रात सलगच्या घसरणीला विराम : सेन्सेक्स 119 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स अखेर सलगच्या घसरणीला विराम देत वधारला आहे. यामध्ये प्रमुख क्षेत्रांमध्ये वाहन, रियल इस्टेट आणि धातू या क्षेत्रांमधील कामगिरीच्या तेजीने बाजाराला बळ मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 118.57 अंकांच्या मजबूतीसोबत 0.19 टक्क्यांनी वधारत निर्देशांक 62,547.11 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 46.35 अंकांनी वधारुन 18,534.10 वर बंद झाला आहे. यामध्ये निफ्टीमधील हिंडाल्को सर्वाधिक 3.43 टक्क्यांनी वधारल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा स्टीलचे समभाग हे सर्वाधिक 1.93 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच मारुती सुझुकीचे समभाग 1.80 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1.71 टक्क्यांनी तेजीत राहिला आहे. यासह सनफार्मा, लार्सन अॅण्ड टुब्रो, टायटन यांचे समभाग वधारले आहेत. यासोबतच भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, आयटीसी, स्टेट बँक, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोर्ट्सचे समभाग वधारुन बंद झाले आहेत.
या समभागांची घसरण
सेन्सेक्समध्ये इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक 1.58 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यासह विप्रोचे समभाग हे 0.60 टक्क्यांनी तर एचसीएल टेक 0.46, टीसीएस 0.46 आणि इंडसइंड बँक 0.40 टक्क्यांनी घसरले. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी, एशियन पेन्ट्स, आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग लाल निशाण्यासह बंद झाले आहेत.
काही क्षेत्रांची कामगिरी
प्रमुख क्षेत्रांची स्थिती पाहिल्यास यामध्ये रियल इस्टेट, वाहन, आणि धातू यांचे निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच आयटी आणि ऑईल अॅण्ड गॅस यांच्या समभागात विक्री राहिली होती.
कोल इंडियामधील हिस्सेदारी विकणार
कोल इंडियामधील ओएफएसच्या मदतीने सरकार 3 टक्क्यांची हिस्सेदारी विकणार आहे. यामुळे आगामी काळात या घटनेचा बाजारावर काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.