आहे, पण…आणायचे कसे?
वीज ही जगात सर्वत्र महत्वाची असणारी एक जीवनावश्यक वस्तू आहे. गेल्या 75 वर्षांमध्ये वीजेचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. वीजनिर्मितीसाठी प्रामुख्याने कोळसा जाळला जात असल्याने वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उष्णता धरुन ठेवण्याची क्षमता असणारा कार्बन डाय ऑक्साईड हा वायू आणि कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू कोळसा जाळल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात सोडले जातात. परिणामी पृथ्वीचे तापमान वाढून धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आता वीजनिर्मिती आणि वाहने चालविण्यासाठी पर्यायी स्वच्छ ऊर्जेचा शोध झपाटल्यासारखा होत आहे. हैड्रोजन, मिथेन, अल्कोहॉल इत्यादी पदार्थांवर प्रयोग जगभरात सुरु आहेत. याच उद्देशाने आपल्याला आज चंद्र खुणावतो आहे. चंद्रावरच्या खडकांमध्ये आणि मातीत ‘हेलियम-3’ नामक मूलद्रव्य काही प्रमाणात आहे, असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. हे मूलद्रव्य वीजेचा फार मोठा साठा आहे. त्यापासून निर्माण केली जाणारी वीज पर्यावरणाची हानी करत नाही. ती अतिशय स्वच्छ ऊर्जा मानली जाते. या मूलद्रव्याची वीजनिर्मिती क्षमता एवढी आहे, की अवघा 30 टन हेलियम-3 भारताला संपूर्ण वर्षभर पुरेल इतकी वीज निर्माण करु शकतो. तर जगासाठी दरवर्षी 600 टन हेलियम-3 पुरेसा आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. चंद्रावर 11 लाख टन हेलियम-3 असावा असा कयास आहे. तो पृथ्वीला 2 सहस्र वर्षे वीज पुरविण्यासाठी पुरेसा आहे. प्रश्न एवढाच आहे की एवढ्या मोठ्या चंद्रातून तो वेगळा कसा करायचा आणि पृथ्वीवर आणायचा कसा ? या प्रश्नाचे उत्तर सापडत नसल्याने सारेच घोडे अडले आहे. पृथ्वीवर याचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके अत्यल्प आहे. तसेच, चंद्रावर तो पृथ्वीच्या मानाने जास्त प्रमाणात असला तरी, सहजगत्या उपलब्ध होईल आणि येथे आणता येईल इतक्या प्रमाणात नाही. त्यामुळे आहे, पण आणता येत नाही, अशी स्थिती झाली आहे. त्यादृष्टीने आता संशोधन होत आहे. अनेक देश आज चंद्रावर याने पाठविण्याच्या स्पर्धेत आहेत. भारताने तर या स्पर्धेत महासत्तांशी बरोबरी केली आहे. याचे कारण चंद्र हा पृथ्वीसाठी संपत्तीचा साठा ठरु शकतो.
अशी स्टंटबाजी नकोच नको
आपल्यापैकी बहुतेकांनी सर्कस पाहिलेली आहे. सर्कशीत जीपची लाँगजंप हा एक अतिशय लोकप्रिय खेळ असतो. निदान पूर्वीच्या सर्कशींमध्ये तो होता. एका उंचवट्यावरुन दुसऱ्या उंचवट्यावर जीपने उ•ाण करण्याचा तो खेळ आहे. या दोन उंचवट्यांमध्ये बरेचसे अंतर असते. या अंतराचा हिशेब मनात ठेवून जीपचा वेग चालकाला निश्चित करायचा असतो. तो जरासा जरी चुकला तरी जीप दुसऱ्या उंचवट्यावर न जाता मध्ये खाली पडून मोठा अपघात होण्याची शक्यता असते. एका अतिसाहसी व्यक्तीने अशा प्रकारे आपली कार एका इमारतीवरुन काही अंतर असलेल्या दुसऱ्या इमारतीवर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे अंतराचे अनुमान चुकले आणि कार दुसऱ्या इमारतीच्या स्लॅबवर न उतरता दोन इमारतींच्या मधल्या मोकळ्या जागेत पडली. वास्तविक या व्यक्तीला हा उपद्व्याप करण्याचे काहीही कारण नव्हते. तो दुसऱ्या इमारतीपर्यंत सहजगत्या चालत जाऊ शकला असता. तथापि, त्याला असा स्टंट करुन प्रसिद्धी मिळवायची होती. त्यामुळे त्याने हे नको ते धाडस केले. कारच्या साहाय्याने अशी लांब उडीं मारण्यासाठी मोठा सराव आवश्यक असतो आणि कारही त्या प्रकारची असावी लागते. पण याचा कोणताही विचार न करता या व्यक्तीने तो धोका पत्करला आणि स्वत:ला संकटात टाकून घेतले. उडी घेतल्यानंतर ती कार दुसऱ्या इमारतीला आदळली आणि खाली जमीनीवर पडली. भाग्य एवढेच की चालकाचा मृत्यू झाला नाही. त्याने सीटबेल्ट घातलेला असल्याने तो फारशा जखमा न होता सुखरुप बाहेर पडला. पण हा स्टंट त्याच्या जीवावर बेतू शकला असता. तेव्हा, प्रसिद्धीसाठी असे स्टंट करताना दहावेळा विचार करणे आवश्यक आहे. शक्यतो ते करु नयेत. अन्य सुरक्षित मार्गांचा उपयोग करुनही भव्य काम करता येते, हा धडा या प्रसंगावरुन घेतला पाहिजे. तसेच सीटबेल्ट किती लाभदायक असतो, हा धडाही यातून मिळतो, अशा प्रतिक्रिया अनेकांनीं व्यक्त केल्या आहेत.
टेलिफोनची तार ‘सरळ’ का नसते?
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, अशी एक म्हण आहे. त्याचप्रमाणे टेलिफोन किंवा बहुतेक सर्व इलेक्ट्रॉनिक साधनांच्या तारा सरळ नसतात. त्या कॉईलप्रमाणे गुंडाळलेल्या स्थितीत असतात. ही बाब आपल्या नित्य परिचयाची आहे. वास्तविक वीज पुरविणाऱ्या इतर तारा सरळ असतात. त्या तारा जे काम करतात त्याच स्वरुपाची कामे टेलिफोनच्या या गुंडाळीयुक्त तारा करतात. मग त्या अशा का असतात असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो हे साहजिकच आहे. अशा तारा केवळ लँडलाईन फोनमध्येच असतात असे नाही. अनेक उद्योगांमध्ये त्या उपयोगात आणल्या जातात. त्या तारा आपण ओढून सरळ केल्या तरी त्या सोडल्यानंतर पुन्हा कॉईल किंवा स्प्रिंगचे स्वरुप प्राप्त करतात. त्या अशा प्रकारच्या का असतात, याचे उत्तर त्यांच्या उपयोगात दडलेले आहे. टेलिफोरवर बोलताना काहीवेळा माणसे फोनच्या जागेपासून दूर जातात. खासगी बोलायचे असेल तर असे दूर जावे लागते. अशावेळी ही कॉईलसारखी तार सोयीची असते. कारण ती कॉईलच्या स्वरुपात असताना छोटी दिसत असली तरी ताणल्यानंतर बरीच लांब होऊ शकते. सोडल्यानंतर पुन्हा ती मूळ स्वरुपात येत असल्याने तिची गुंडाळी करुन ठेवावी लागत नाही. ती पायात येऊन घोळ होत नाही. ही सोय केवळ अशाच तारांमध्ये असल्याने फोनसारख्या वस्तूंना त्या जोडलेल्या असतात.
बेडकांची शेती, पैशाची शाश्वती
हा चीनमधींल प्रकार आहे. चीन आणि त्याच्या आसपासच्या इतर काही देशांमध्ये बेडकांचा उपयोग आहारात केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेडूक मारले जातात. भारतासारख्या देशांमध्ये बेडूक हा अलिकडच्या काळात दुर्मिळ प्राणी झाल्याने काही प्रकारच्या बेडकांच्या हत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. पण असा नियम जेथे बेडूक ही खाण्याची बाब आहे तेथे अशी बंदी घातलेली नसते. यातूनच एका व्यक्तीच्या डोक्यात बेडकांची शेती करण्याची कल्पना आली. त्याने आपल्या रिकाम्या जागेत एक पाण्याचा मोठा हौद बांधून घेतला आणि त्यात बेडकांची पैदास केली. हळूहळू बेडकांची संख्या इतकी वाढली की त्यांची एक सेनाच निर्माण झाली आहे. या व्यक्तीने नेमके नाव गुलदस्त्याद आहे. मात्र, तो स्वत:ला ‘फ्रॉग लव्हर’ म्हणवून घेतो. जशा हजारोंच्या संख्येने कोंबड्या पाळल्या जातात, त्याप्रकारे त्याने बेडूक पाळले आहेत. हे बेडूक मोठे होतात तेव्हा मांसासाठी त्यांची हत्या केली जाते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो. साधारणत: 50 वर्षांपूर्वी बेडकांच्या शेतीची कल्पना कोणाला तरी सुचली आणि त्याला मिळालेला लाभ पाहून आता अनेकांनी अशी शेती करण्यास प्रारंभ केला आहे. बेडकाच्या मांसाची निर्यातही केली जात आहे. चीनसह थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी देशांमध्ये बेडकाच्या मांसाचा आहार म्हणून उपयोग केला जातो. विशेषत: मोठ्या जातीच्या बेडकाच्या मांसाला अधिक मागणी असते. बेडकाचे मांस चवदार असते, असे या क्षेत्रातल्या तज्ञ लोकांचे म्हणणे आहे.
इतकी असते स्वेटरची किंमत ?
दोन महिन्यांमध्येच थंडीचा मोसम सुरु होत आहे. थंडी आणि स्वेटर यांचे अतूट नाते आहे. बाजारात स्वस्त ते महाग अशा प्रकारचे स्वेटर आता लवकरच दिसू लागतील. पण एका स्वेटरची अधिकतर किंमत किती असू शकते ? दोन हजार रुपये, फार तर 10 हजार रुपये अशी आपली समजूत असेल तरी ती या जगातील एका स्वेटरने तरी खोठी ठरविली आहे. या स्वेटरची किंमत आहे तब्बल 9 कोटी रुपये. अविश्वसनीय वाटावी अशीच ही बाब आहे. हा स्वेटर काही खास वेगळा आहे असे म्हणावे तर तसेही नाही. तो कोणत्याही सामान्य स्वेटरसारखाच दिसतो. तो लाल रंगाचा आहे. नवाही नसून जुनाच आहे. तरीही त्याची इतकी किंमत अशी हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. तर या प्रश्नाचे उत्तर या स्वेटरमध्ये नसून तो ज्या व्यक्तीचा होता तिच्यात आहे. हा स्वेटर आहे ‘प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना हिचा. ती ब्रिटनच्या राजघराण्याची सून आणि ब्रिटनची युवराज्ञी होती. ब्रिटनचे युवराज चार्ल्स यांची पत्नी आणि राजपुत्र हॅरी आणि विल्यम यांची माता होती. 1997 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी तिचा पॅरिसमधींल भीषण कार अपघातात मृत्यू झाला होता. ती अतिशय लोकप्रिय युवराज्ञी होती. तिचा अपघाती मृत्यू आणि त्या मृत्यूची कारणे जगाच्या चर्चेचा विषय ठरली होती. आजही ती घटना पुष्कळसे लोक विसरलेले नाहीत. हा लाल स्वेटर तिचा असल्याचे त्याची एवढी किंमत आली. नुकतीच या स्वेटरची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एका अज्ञात बोलीदाराने 9 कोटींची बोली लावली होती.