अमेरिकेच्या ऍलिसन फेलिक्सला मिश्र रिलेत कांस्यपदक
वृत्तसंस्था/ युगेनी (ओरेगॉन)
शुक्रवारपासून येथे सुरु झालेल्या 2022 विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे ऍथलिट्स अविनाश साबळे आणि मुरली श्रीशंकर यांनी अनुक्रमे पुरुषांच्या 3000 मी. स्टीपलचेस आणि पुरुषांच्या लांब उडी प्रकारात अंतिम फेरीत स्थान संपादन करत नवा इतिहास घडविला. या स्पर्धेत अमेरिकेची महिला ऍथलिट ऍलिसन फेलिक्सने मिश्र रिले प्रकारात कांस्य पदक पटकाविले. फेलिक्सची ही शेवटची विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा आहे. आतापर्यंत तिने या स्पर्धेत 19 पदके पटकाविली आहेत.
पुरुषांच्या 3000 मी. स्टीपलचेस या क्रीडाप्रकारात भारताचा धावपटू अविनाश साबळेने अंतिम फेरीपूर्वी झालेल्या पात्रतेच्या फेरीत 8 मिनिटे, 18.75 सेकंदाचा अवधी घेतला. साबळेने सलग दुसऱयांदा या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. 37 वर्षीय अविनाश साबळे घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरु शकला नव्हता.
अविनाश साबळेने 2018 साली भुवनेश्वरमध्ये झालेल्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत 37 वर्षांचा अबाधित राहिलेला गोपाळ सैनीचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकताना 8 मिनिटे 30.88 सेकंदाचा अवधी घेतला होता. त्यानंतर 2019 च्या मार्चमध्ये पतीयाळा येथे झालेल्या फेडरेशन चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेने 8 मिनिटे, 28.94 सेकंदाचा नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविल्याने तो 2019 च्या आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धा आणि 2019 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती.
विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी 1991 नंतर दोनवेळा पात्र ठरणारा अविनाश साबळे हा भारताचा पहिला ऍथलिट आहे. 1991 साली भारताच्या दीना रामने असा पराक्रम केला होता. 2019 दोहा आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेने रौप्यपदक मिळविताना 8 मिनिटे, 30.19 सेकंदाचा अवधी नोंदविला. साबळेने यापूर्वीचा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम 2019 विश्व ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मोडीत काढताना 8 मिनिटे, 25.23 सेकंदाचा अवधी नोंदविला. 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठी साबळेने आपली पात्रता सिद्ध केली होती. पण या स्पर्धेत त्याला पात्र फेरीमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या लांब उडी क्रीडाप्रकारात भारताच्या मुरली श्रीशंकरने पात्र फेरी स्पर्धेतील ब गटातून दुसरे स्थान मिळविताना 8 मी. ची लांब उडी घेतली. या कामगिरीमुळे तो या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. लांबउडी क्रीडाप्रकारात महिलांच्या विभागात भारताच्या अंजू बॉबी जॉर्जने यापूर्वी अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळविताना 2003 साली पॅरिसमध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले होते. भारताच्या जस्विन अल्ड्रीन आणि मोहम्मद अनिस याहिया या यांना या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. जेस्विन नवव्या तर मोहम्मद अनिस अकराव्या स्थानावर राहिले. पात्र फेरीमध्ये जपानच्या हेशीओका आणि अमेरिकेच्या डिनेडी यांना केवळ 8.15 मी. चा टप्पा ओलांडता आला. महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये भारताची पारुल चौधरी सहभागी होणार आहे.
फेलिक्सला कांस्य पदक
अमेरिकेची महिला धावपटू ऍलिसन फेलिक्सने 4 ƒ 400 मी. मिश्र रिले कांस्यपदक मिळविले. 36 वर्षीय ऍलिसन फेलिक्सची ही शेवटची विश्व ऍथेलेटिक्स स्पर्धा आहे. आतापर्यंत तिने आपल्या वैयक्तिक ऍथलेटिक्स कारकीर्दीत या स्पर्धेमध्ये एकूण 19 पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात तिने 10 वेळा आपला सहभाग दर्शविला असून तिचे या स्पर्धेतील हे तिसरे कांस्यपदक आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिने आतापर्यंत 11 पदके मिळविली आहेत. या क्रीडाप्रकारात डॉमनिक प्रजासत्ताकच्या ऍथलिटने सुवर्णपदक तर हॉलंडच्या धावपटूने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 20 किमी चालण्याच्या शर्यतीमध्ये पेरुच्या किंबर्ली गार्सियाने महिलांच्या विभागात सुवर्णपदक मिळविताना 1 तास, 26.28 मिनिटांचा कालावधी घेतला. पुरुषांच्या 20 किमी चालण्याच्या शर्यतीत जपानच्या तोशिकेजू यमानीशीने 1 तास, 19.07 मिनिटांचा कालावधी घेत सुवर्णपदक पुन्हा स्वतःकडे राखले.