46 लाखांचे भाडे थकल्याने कार्यालयाचा ताबा देण्यास नकार : प्रवाशांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाच्या विकासाचे काम पूर्ण होऊन चार महिने उलटले. पण अद्याप बस नियंत्रक व आवश्यक सुविधांचा पत्ता नाही. परिवहन मंडळाचे भाडे थकले आहे. तसेच वीजबिलाची रक्कम थकली असल्याने परिवहन मंडळाला कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे परिवहन मंडळाने या ठिकाणी बस नियंत्रकाची नियुक्ती केली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कारवार बसस्थानकामधून उत्तर भागातील बस आणि पणजी, वास्को, रामनगर, कारवार, हल्ल्याळ अशा विविध भागातील बस ये-जा करीत असतात. त्यामुळे याठिकाणी कर्नाटक परिवहन मंडळ आणि गोवा परिवहन मंडळाची कार्यालये सुरू केली होती. पण कार्यालयाच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने या बसस्थानकाचा विकास करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कार्यालयेदेखील बंद केली होती.
बसस्थानकावर बसचे वेळापत्रक व प्लॅटफॉर्मवर नामफलक नसल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करणे गरजेचे आहे. हेस्कॉमच्या बिलाची रक्कम थकल्याने बसस्थानकाला विद्युत पुरवठा जोडणी करण्यात आली नाही. परिणामी सदर बसस्थानक चार महिन्यांपासून अंधारात आहे. त्यामुळे या ठिकाणी गैरप्रकार चालत आहे.
कर्नाटक व गोवा शासनाच्या परिवहन मंडळाने कार्यालयाच्या भाडय़ाची रक्कम कॅन्टोन्मेंटला भरली नाही. 46 लाखांचे भाडे थकल्याने बसस्थानकावरील कार्यालयाचा ताबा कॅन्टोन्मेंटने परिवहन मंडळाकडे देण्यास नकार दिला. परिवहन मंडळ व कॅन्टोन्मेंटच्या वादात बसस्थानकाची दुरवस्था झाली. याबाबत तोडगा काढून नियंत्रण कक्ष सुरू करावे. तसेच सर्व बस स्थानकावर याव्यात, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.