एखादा दिवस असा उजाडतो की आपल्याला सहजपणे गतीने हालचाल करता येत नाही. आपला तोल सांभाळला जात नाही. आपल्याला थरथर जाणवते. जडत्व येते आणि काहीच करू नये, असे वाटू लागते. ही सर्व बॅलेन्स डिसऑर्डर म्हणजेच संतुलन किंवा समतोल न राखण्याची लक्षणे आहेत. हा सप्ताह बॅलेन्स अवेअरनेस वीक म्हणून ओळखला जातो.त्यानिमित्त… आपला तोल राखण्यासाठी आपल्या कानाच्या आत असलेली व्हेस्टीब्युलर यंत्रणा महत्त्वाची आहे. आपण तोल न जाता व्यवस्थित राहू शकतो, याचे कारण आपल्या शरीरातील ही यंत्रणा व्हिज्युअल व मस्क्युलो स्केलेटलच्या सहकार्याने काम करते. मात्र, दुर्दैवाने मेंदूशी संबंधित विविध विकार या यंत्रणेला बाधा पोहोचवू शकतात. ज्यामुळे चक्कर येणे, तोल जाणे (व्हर्टिगो) अशा तक्रारी उद्भवतात. तोल जाण्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. चालणे किंवा बाहेर कोणत्याही कामासाठी जाणे हे आव्हानात्मक ठरते. त्यामुळे चिंता, तणाव आणि नैराश्य वाढीस लागते. अशा वेळी उष्मांक चाचणी, डिक्स हॉलपाईक चाचणी व वेस्टीब्युलर इव्होक्ड, मायोजनिक, पोटॅन्शियल ही निदान पद्धती या विकारांना ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते.
तोल जाण्याच्या विकारासह राहणे हे तसे अडचणीचे ठरते. आपल्याला समाजामध्ये मिसळण्यासाठी मर्यादा येतात. मानसिक अनारोग्य वाढीस लागते. या सर्वांबाबत जागृती करण्यासाठी हा सप्ताह महत्त्वाचा आहे. सामान्य लक्षणांमध्ये चक्कर येणे, डोके दुखणे, अस्थिरता जाणवणे यांचा समावेश आहे. यासाठी व्हीएनजी, ईसीओजी, टोमोग्राफी, एमआरआय यासारख्या चाचण्या करून विकाराचे मूळ ओळखले जाते. विकाराचे निदान झाल्यावर औषधे, उपचार व्हेस्टीब्युलर पुनर्वसन उपचार थेरपी यांची मदत घेतली जाते. व्हिजीओथेरपीसुद्धा या विकारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तोल जाण्याचा विकार असलेल्यांचे समुपदेशन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि समाजामध्ये त्यांना सहज वावरता यावे, यासाठी मदत करणे तसेच समाजाने अशा रुग्णांना समजून घेऊन त्यांना सहकार्य करणे यासाठी हा सप्ताह महत्त्वाचा आहे. योग्य निदान, उपचार आणि विकाराचा सामना करण्याची मानसिकता यांचे योग्य व्यवस्थापन हा आजार किंवा विकार कमी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात.