रशियाने घडवून आणली शस्त्रसंधी : 200 जण मारले गेल्याचा दावा
वृत्तसंस्था /बाकू
अझरबैजानने 24 तासांपर्यंत चाललेल्या संघर्षानंतर नागोर्नो-काराबाख भूभागावर पुन्हा कब्जा मिळविला आहे. अझरबैजानच्या अध्यक्षांनी यासंबंधी गुरुवारी घोषणा केली आहे. फुटिरवाद्यांच्या सशस्त्र दलाने शरणागती पत्करल्यावर अझरबैजानच्या अध्यक्षांनी स्वत:च्या देशाच्या सैन्याचे कौतुक केले आहे. अझरबैजानने 19 सप्टेंबर रोजी आर्मेनियाच्या नियंत्रणातील नागोर्नो-काराबाखमध्ये फुटिरवाद्यांवर हल्ले केले होते. नागोर्नो-काराबाखमधील फुटिरवादी शरणागती पत्करत नाहीत तोवर ही लढाई सुरू राहणार असल्याचे अझरबैजानने म्हटले होते. आर्मेनियाकडून कुठल्याही प्रकारची मदत न मिळाल्याने काराबाखमधील फुटिरवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. आर्मेनियाच्या अधिकाऱ्यांनुसार हल्ल्यात 7 नागरिकांसमवेत 32 जणांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झाले आहेत. तर आर्मेनियन वंशाच्या फुटिरवाद्यांनुसार हल्ल्यात सुमारे 200 जणांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीपूर्वी अझरबैजानने फुटिरवाद्यांच्या सुमारे 90 तळांवर कब्जा केला होता.
रशियाची मध्यस्थी
20 सप्टेंबर रोजी रशियाने दोन्ही गटांमध्ये शस्त्रसंधी घडविली आहे. ही शस्त्रसंधी अझरबैजानच्या अटींनुसार झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर अझरबैजानच्या सैन्याने आर्मेनिया विरोधातील स्वत:ची सैन्यमोहीम रोखली आहे. करारावरून दोन्ही बाजूंची पहिली बैठक अझरबैजानच्या येवलाख शहरात गुरुवारी पार पडली आहे. करारानुसार काराबाख फोर्सचे अस्तित्व संपुष्टात आणत त्याच्याकडील शस्त्रास्त्रs जप्त केली जाणार आहेत. याचबरोबर आर्मेनियाच्या सैन्यालाही मागे हटण्यास सांगण्यात आले आहे. परंतु काराबाख क्षेत्रात आपले सैन्य कधीच तैनात नव्हते असा दावा आर्मेनियाच्या सरकारने केला आहे.