वृत्तसंस्था/ लाहोर
2023 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाक संघाची मोहिम प्राथमिक फेरीअखेरच संपुष्टात आल्याने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाचे सोमवारी येथे आगमन झाले.
लाहोरच्या विमानतळावर उतरल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि त्याच्या सहकाऱ्यांचे थंडे स्वागत झाले. दरम्यान पाक क्रिकेट मंडळाकडून येणाऱ्या आदेशाची बाबर आझमला काही वेळ वाट पहावी लागली. बाबर आझमचे स्वागत करण्यासाठी त्याचे कुटुंबिय सदस्य उपस्थित होते. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. चालू आठवड्याच्या अखेरीस बाबर आझम पीसीबीचे प्रमुख झेका अशरफ यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. 1992 साली पाक संघाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. पण 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाला 9 पैकी 5 सामने गमवावे लागल्याने त्यांचे उपांत्य फेरीसाठीचे आव्हान संपुष्टात आले. 2019 साली बाबर आझमची पाक वनडे संघाच्या कर्णधारपदी तर 2021 साली त्याची पाक कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती पीसीबीने केली होती. पाक संघाने बाबरच्या नेतृत्वाखाली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा तसेच दोन वेळेला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. मात्र बाबरच्या नेतृत्वाखाली पाक संघाला एकही स्पर्धा जिंकता आली नाही.
बाबर आझमची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता असून सर्फराज अहमद किंवा शाहिन आफ्रिदी यांची या पदावर नियुक्ती केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डिसेंबरच्या प्रारंभी पाकचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. तत्पुर्वी पाक संघाच्या दुसऱ्या कर्णधाराची निवड करणे आवश्यक आहे.