वृत्तसंस्था /कराची
विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीच्या आधीच पाक संघ बाहेर पडल्यानंतर बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पाक संघाला या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाचवे स्थान मिळविले. विश्वचषक स्पर्धेत पाकने 9 पैकी पाच सामने गमविले. त्यात अफगाणविरुद्ध झालेल्या धक्कादायक पराभवाचाही समावेश आहे. संघाच्या या कामगिरीमुळे बाबरच्या नेतृत्वावर शंका घेण्यात येऊ लागल्या होत्या. जाणकार व टीकाकारांनी नेतृत्वबदलाची गरज असल्याचेही मत व्यक्त केल्यानंतर संघ मायदेशी आल्यावर बाबरला पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. पण बाबरने नंतर कर्णधारपदाचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. तिन्ही प्रकारच्या संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगून खेळाडू म्हणून यापुढेही खेळत राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे.