पी. व्ही. सिंधूला उसळी घेण्याची, तर प्रणॉयला मागील यशाची पुनरावृत्ती घडविण्याची आशा
वृत्तसंस्था/ सिंगापूर
सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा आज मंगळवारपासून सुरू होत असून त्यात गतविजेती पी. व्ही. सिंधू थायलंडमध्ये नीचांकी कामगिरी केल्यानंतर पुन्हा उसळी घेण्याचा विचार करत असेल, तर फॉर्ममध्ये असलेला एच. एस. प्रणॉय मात्र आत्मविश्वासाने भरलेला असेल. ही जोडी या स्पर्धेतील भारतीय आव्हानाचे नेतृत्व करेल.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये घोट्याला दुखापत झाल्यापासून सिंधूसाठी परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती हळूहळू तिच्या सर्वोत्तम कामगिरीकडे जात आहे. माद्रिद स्पेन मास्टर्स आणि मलेशिया मास्टर्समध्ये तिने अनुक्रमे अंतिम आणि उपांत्य फेरी गाठली. या हंगामातील ही तिची सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे. तथापि, थायलंड ओपनमध्ये कॅनडाच्या मिशेल लीसमोर निसटता पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ती पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर फेकली गेली. शेवटचे ‘बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर’ विजेतेपद तिला याच स्पर्धेत प्राप्त झाले होते.
त्यातच सिंधूचा सामना जपानच्या जागतिक यादीतील अग्रक्रमांकावरील अकाने यामागुचीशी होईल. तिच्याविरुद्ध सिंधूच्या कारकिर्दीतील काही सर्वांत कठीण लढती नोंदल्या गेल्या आहेत. कागदावर सिंधूचे पारडे यामागुचीपेक्षा 14-9 असे जड आहे. परंतु गेल्या वर्षी थायलंडमध्ये दोघांचा सामना झाल्यापासून बरेच काही बदलले आहे आणि भारतीय खेळाडूला यावेळी सरशी होण्यासाटी बरेच प्रयत्न करवे लागतील.
दुसरीकडे, प्रणॉय सहा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवून मलेशिया मास्टर्समध्ये पहिला ‘बीडब्ल्यूएफ’ किताब मिळविल्यानंतर या स्पर्धेत उतरत आहे. त्या विजयाने प्रणॉयची भूक नक्कीच वाढवली असेल. या क्षणी तरी तो भारताचा एकेरीतील सर्वांत सातत्यपूर्ण खेळाडू आहे. तथापि, त्याच्यासाठीही गोष्टी सोप्या नसतील. कारण जपानचा तिसरा मानांकित खेळाडू कोडाई नाराओकाशी त्याची सलामीच्या सामन्यात गांठ पडणार आहे.
थायलंडमध्ये उपांत्य फेरीत आव्हान संपलेला लक्ष्य सेन देखील बरीच मजल मारण्याची आशा बाळगून असेल. परंतु त्याच्या मार्गात चाउ तिएन चेन हा चिनी तैपेईचा पाचवा मानांकित खेळाडू आहे. 2021 च्या जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या किदाम्बी श्रीकांतची त्याच्या सुऊवातीच्या सामन्यात थायलंडच्या कांताफोन वांगचारोएनशी, तर ऑर्लिन्स मास्टर्स विजेत्या प्रियांशू राजावतची गांठ जपानच्या कांता त्सुनेयामाशी पडेल.
महिला एकेरीत लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवाल थायलंडच्या रत्चानोक इंतानोनशी, तर पुऊष दुहेरीत जागतिक यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रान्कीरे•ाr जपानच्या अकिरा कोगा आणि ताइची सायटोशी भिडतील. एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला यांचा सामना फ्रान्सच्या लुकास कॉर्व्ही आणि रोनन लाबर या जोडीशी, तर ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीतील जोडीचा पहिल्या फेरीत सामना हाँगकाँगच्या येउंग न्गा टिंग आणि येउंग पुई लाम यांच्याशी होईल.