साक्षीदारांना प्रभावित करण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने ईडीकडून नोंद करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आरोप अत्यंत गंभीर असल्याने त्यांची 6 आठवड्यांसाठी मुक्तता करणे अवघड असल्याचे न्यायाधीश दिनेश शर्मा यांनी सोमवारी म्हटले आहे.
सिसोदिया यांनी स्वत:ची पत्नी सीमा यांच्या प्रकृती अस्वास्थाचा दाखला देत जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणी पूर्ण करत दिल्ली उच्च न्यायालयाने शनिवारी निर्णय राखून ठेवला होता.
सीमा सिसोदिया यांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. उपचार कुठे करवून घ्यायचा याचा निर्णय सीमा सिसोदिया तसेच कुटुंबीयांनी घ्यावा. एम्सचे डॉक्टर्स त्यांची वैद्यकीय तपासणी करू शकतात असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.
सीमा सिसोदिया यांच्या इच्छेनुसार मनीष सिसोदिया यांना पत्नीची भेट घेण्याकरता सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजण्यादरम्यान घरी किंवा रुग्णालयात नेण्यात यावे. घर किंवा रुग्णालयाबाहेर या भेटीप्रसंगी प्रसारमाध्यमे पोहोचू नयेत याची काळजी पोलीस आयुक्तांनी घ्यावी असा निर्देश न्यायालयाने दिला आहे.
सिसोदिया यांनी काही काळासाठी जामीन मिळाल्यावरही ते आजारी पत्नीला भेटू शकले नव्हते. शनिवारी सकाळी पत्नी सीमा यांना भेटण्यासाठी ते घरी पोहोचले होते, परंतु त्यापूर्वीच सीमा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करविण्यात आले होते. न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना रुग्णालयात जाण्याची अनुमती दिली नव्हती. यामुळे सिसोदिया यांना स्वत:च्या पत्नीला भेटता आले नव्हते.