डिजिटल युगात, सोशल मीडियाने आपल्या संवादात, नाते-संबंधामध्ये आणि माहिती मिळवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती केली आहे. या परिवर्तनामुळे एक उद्योग ज्यावर लक्षणीय परिणाम झाला आहे तो म्हणजे चित्रपट वितरण! सोशल मीडिया माध्यमे हे चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांच्या प्रकल्पांची जाहिरात करण्यासाठी, प्रेक्षकांशी संलग्न राहण्यासाठी आणि चित्रपटाच्या येण्याची खूप आधीपासून त्याची चर्चा निर्माण करण्यासाठी शक्तिशाली साधन बनले आहे. या लेखाद्वारे चित्रपट वितरण धोरणांवरील सोशल मीडियाच्या सखोल प्रभावाचा आणि त्याने प्रेक्षकांच्या अभिऊचीला कसा आकार दिला आहे याबद्दल चर्चा केली आहे.
चित्रपट वितरणामध्ये सोशल मीडियाचा उदय
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या सोशल मीडिया व्यासपीठाच्या उदयामुळे, चित्रपट वितरण एक प्रकारे परस्पर संवादी झाले आहे जे प्रेक्षकांना त्या चित्रपटाच्या दुनियेचा भाग बनवते आणि प्रेक्षकांशी एक वैयक्तिक संबंध जोडायला लागले आहे. पूर्वी, दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांची जाहिरात करण्यासाठी चित्रपटातील एक छोटा भाग ‘टेलर’च्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवायचे, किंवा भित्तीपत्रिकावरील जाहिरातींवर जास्त अवलंबून असत. पण, सोशल मीडियाच्या आगमनाने चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांशी अधिक थेट, त्वरित आणि वैयक्तिक संवाद साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
टीझर, टेलर आणि आगामी चित्रपटांच्या पडद्यामागील झलक प्रकाशित करण्यासाठी युट्यूब हे पसंतीचे व्यासपीठ बनले आहे. कुठेही न जाता, निर्मात्यांचा संदेश लाखो लोकांपर्यंत एका चुटकीसरशी पोहोचतो आहे. ज्यामुळे फक्त निर्मातेच नाही तर प्रेक्षकदेखील खूप खूष आहेत. आज सोशल मीडियामुळे कलावंत आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधू शकतात. पूर्वीच्या काळी सामान्य माणसांसाठी चित्रपट सृष्टी ही खूप अप्राप्य वाटायची कारण त्यात फक्त मोठे, श्रीमंत आणि प्रभावशाली लोक भाग घेऊ शकत होते. पण आज, सोशल मीडियामुळे याच प्रभावशाली कलाकारांशी जोडून आपण त्यांचा आयुष्याचा एक छोटासा भाग होऊ शकतो.
सोशल मीडियावर चित्रपटांची जाहिरात करण्याचे मार्ग खूप वैविध्यपूर्ण झाले आहेत. ज्यामध्ये चाहत्यांशी संवाद, ऑनलाइन खेळ, नृत्य आव्हाने (इन्स्टाग्राम रील्स) आणि अगदी चित्रपटाशी संबंधित प्रŽमंजुषा यांचादेखील समावेश आहे.
पण हे वास्तव आहे का?
बऱ्याच वेळा सोशल मीडियावरील मजकुराचा आस्वाद घेताना प्रेक्षक त्यात वाहवत जातात आणि वास्तव काय आहे हे विसरतात. निर्माते आणि चित्रपट वितरक इतक्मया कुशलतेने चित्रपटाची व त्यात असलेल्या कलाकारांची जाहिरात करतात की दर्शवलेलेच जग खरे आहे असे बरेचदा प्रेक्षकांना वाटू लागते. सोशल मीडिया उत्सुकता निर्माण करू शकतो, तर तो अनवधानाने अवास्तव अपेक्षादेखील निर्माण करू शकतो. चित्रपट अतिशयोक्तीपूर्ण दावे, खोटी तथ्ये आणि दिशाभूल करणारी शीर्षके देऊ शकतात आणि त्यापलीकडे अपेक्षा वाढवू शकतात. सोशल मीडियावर आकर्षक वाटणारा चित्रपट किंवा कलाकार हा खरंच तेवढा होतकरू आहे का याचा निकाल चित्रपट बघितल्याशिवाय कळत नाही. आणि जेव्हा बऱ्याचदा जाहिरातीत अतिशयोक्तीपूर्ण मजकूर दाखवला जातो, त्याच्या तुलनेत चित्रपट तेवढा मनोरंजक आणि क्रांतिकारक प्रत्येक वेळेला असतोच असे नाही. अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील ही विषमता निराशेला कारणीभूत ठरू शकते, ज्यामुळे चित्रपटाच्या स्वागतावर आणि बॉक्स ऑफिसच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे तर सोशल मीडियाचे तात्कालिक स्वरूप किरकोळ समस्यांना मोठ्या वादात बदलू शकते. चित्रपट चित्रपटगृहात येण्यापूर्वी, एकच प्रतिकूल टिप्पणी किंवा टीकात्मक पुनरावलोकन व्हायरल चर्चेला सुऊवात करू शकते आणि चित्रपटाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते. प्रेक्षकांचा सहभाग अत्यावश्यक असला तरी, रहस्य निर्माण करणे आणि प्रेक्षकांना चित्रपटाची गरजेपेक्षा जास्त माहिती देणे यामध्ये काळजीपूर्वक संतुलन असले पाहिजे. जास्ती माहिती आणि सोशल मीडियावर सतत फिरणाऱ्या मजकुरामुळे चित्रपटाबद्दलचा उत्साह कमी होऊ शकतो.
कलाकारांचे आयुष्य, पैसे, प्रसिद्धी आणि जीवनशैली पाहून प्रेक्षक खूप प्रभावित होतात. कलाकारांचा निष्ठावंत चाहतावर्ग त्यांना आदर्श म्हणून बघू लागतो आणि त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित केलेली सगळी माहिती खरी मानू लागतो. पण अशावेळेला आपल्या हे लक्षात येत नाही की निर्माते चित्रपटाचे वितरण करताना एक विशिष्ट धोरण अवलंबतात, त्याच बरोबर, प्रेक्षकांशी अधिक जुळण्यासाठी ते त्यातील कलाकारांनासुद्धा एका विशिष्ट पद्धतीने पेश करायला लागतात. चित्रपटात एखादा कलाकार जर खूप चांगले, मानवतावादी पात्र निभावत असेल तर तो कलाकार प्रत्यक्षातदेखील तसाच आहे असे दर्शवले जाते. प्रेक्षक पुढचा मागचा विचार न करता हेच सत्य मानतात आणि मग दिशाभूल होते.
सोशल मीडियाचा सिनेमा प्रक्षेपणावर होणारा प्रभाव आणि प्रेक्षकांचा सहभाग हा सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचे एक जटिल संयोजन आहे. हे जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी, वास्तववादी वचनबद्धता आणि सहज प्रचारासाठी अतुलनीय संधी प्रदान करते, परंतु चुकीची माहिती, प्रतिक्रिया आणि अति प्रदर्शनाच्या जोखमींचाही परिचय करून देते.
डिजिटल मीडियाचे जग जसजसे विकसित होत आहे, तसतसे या नेहमी बदलणाऱ्या वातावरणात संचार करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या पद्धती सुधारल्या पाहिजेत. प्रेक्षकांना गृहीत न धरता, त्यांच्यासमोर चांगला, सकारात्मक आणि क्रांतिकारक मजकूर आणला पाहिजे. त्यांच्या भावनांशी आणि मानसिकतेशी न खेळता, त्यांना मनोरंजनाचा पुरेपूर आस्वाद घेऊ देण्याची संधी निर्मात्याने व कलाकाराने निर्माण करून दिली पाहिजे.
त्याचबरोबर, प्रेक्षकांनी सोशल मीडियावरील मजकुराकडे कुतूहलाने बघितले पाहिजे. दाखवलेला किंवा प्रचार केलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करूनच आपली निष्ठा कुठे आहे हे ठरवले पाहिजे. खरंतर निर्माते आणि प्रेक्षक या दोघांसाठी या सुविधेचा पुरेपूर फायदा करून घेण्याची युक्ती म्हणजे सोशल मीडियाच्या क्षमतांचा सकारात्मक वापर करणे आणि त्यातील संभाव्य तोटे टाळणे. यामध्ये जर दोन्ही बाजूनी सुरेख संतुलन पाळले तर निर्माते अधिक प्रभावशालीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकतील आणि प्रेक्षक त्यांच्यासमोर मांडलेल्या मजकुराचा आणि मनोरंजनाचा पुरेपूर आस्वाद घेऊ शकतील!!
-श्राव्या माधव कुलकर्णी