ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या जागेसाठी इच्छूक असलेल्या काँग्रेसमधील बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. दाभेकर यांनी आज शहरातून रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसमधील नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे आणि बाळासाहेब दाभेकर यांच्या नावाची चर्चा होती. यामधील धंगेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे दाभेकर यांनी बंडखोरी केली. दाभेकर यांनी आज सकाळी नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून रॅली काढली. ही रॅली पुढे केसरीवाडा, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रीडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त झाली. रॅलीच्या सांगतेनंतर दाभेकर उमेदवारी अर्ज दाखल केला. दाभेकर यांच्या बंडखोरीचा भाजपला फायदा होणार असल्याचे बोलले जाते.
अधिक वाचा : थोरातांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचाली; प्रभारी एच. के. पाटील मुंबईकडे रवाना