वाकरे / प्रतिनिधी
कोल्हापूर-गगनबावडा राज्यरस्त्यावर बालिंगे स्मशानभूमीनजीक ट्रॅक्टर ट्रेलर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला. सुरेश सुभाष जगताप (रा.सावर्डे दुमाला,ता.करवीर) असे मृताचे नाव आहे.
या अपघाताबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की बालिंगे येथील स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या ओढ्यानजीक सावर्डे येथील सुरेश जगताप हा ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन कोल्हापूरकडे विटा तयार करण्यासाठी लागणारा कसवा आणण्यासाठी जात होता.यावेळी स्मशानभूमी असणाऱ्या ओढयानजीक सुरेश दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करत होता.या ओढ्याशेजारी मोठया प्रमाणात कचरा आहे.या कचऱ्यावर ट्रॅक्टर ट्रॉली गेल्याने सुरेशचा द्रॅक्टर ट्रॉलीवरील ताबा सुटल्याने ओढ्याशेजारी खोल असणाऱ्या रस्त्याखाली ट्रॅक्टर ट्रॉली कोसळली. ट्रॅक्टरच्या चाकामध्ये सापडल्याने सुरेश जागीच ठार झाला.यावेळी घटनास्थळी करवीरचे उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण यांनी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठवला.या अपघाताची करवीर पोलिसात नोंद झाली आहे .