समाधानकारक पाऊस पिकांना पोषक, दमदार पावसाची अपेक्षा
बेळगाव : मागील दोन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जुलैअखेरीस झालेल्या पावसानंतर तो गायबच झाला होता. बऱ्याच दिवसांनंतर समाधानकारक पाऊस झाला आहे. रविवारी शहरासह तालुक्यामध्ये संततधार पाऊस झाल्याने हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे भात पिकांसह सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसामुळे शहरातील भाजी विक्रेते फेरीवाल्यांची मात्र तारांबळ उडाली होती. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. तर काही रस्त्यांवर दल दल झाली होती. त्यामधून वाट काढताना साऱ्यांनाच कसरत करावी लागत होती. गेल्या आठ दिवसांपासून आकाशात ढग दाटून येत होते. मात्र पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत होता. शनिवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर अधून मधून दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचून होते. या पावसामुळे साऱ्यांना छत्री आणि रेनकोटचा आधार घ्यावा लागला. बऱ्याच दिवसानंतर पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
भात पिकांना हा पाऊस पोषक
सध्या भात पिके पोसवत आहेत. त्यामुळे भात पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र पावसाला सुरुवात झाल्याने त्यांची चिंता कमी झाली आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असली तरी अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. वास्तविक एक महिन्यापूर्वीच पाऊस झाला असता तर बटाटा, सोयाबीन, भुईमूग या पिकांनाही हा पाऊस पोषक ठरला असता.
जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ
बेळगाव तालुक्याबरोबरच जिह्यातील बहुसंख्य तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. त्यामुळे जिह्यातील जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये काहीशी वाढ झाली आहे. या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून येत्या दोन दिवसांमध्ये आणखीन पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा म्हणावा तसा पाऊस बरसला नाही. त्यामुळे शेतीपिकांना फटका बसू लागला आहे. मध्यंतरी दीड महिना पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पाऊस आल्याने बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. जून कोरडा गेला होता. हस्त नक्षत्रात आता पावसाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यातील पिकांसाठी सध्या होत असलेला पाऊस पोषक असल्याचे बोलले जात आहे.
मलप्रभा नदीच्या पाणीपातळीत वाढ
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. कणकुंबी, जांबोटी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतशिवारात पाणी साचू लागले आहे. परंतु पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यास भातपिकासह भाजीपाला पिकांना याचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
राकसकोपच्या पाणीपातळीत वाढ
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्राखालील परिसरात शनिवारी 16.9 मि. मी. तर रविवारी सकाळी 25 मि. मी. पाऊस झाल्याने पाव फूट पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी सकाळच्या 2474.95 फूट पाणीपातळीत वाढ होत पाणीपातळी 2475.20 फूट इतकी झाली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी 485 मि. मी. पाऊस कमी झाला आहे. आजपर्यंत एकूण 1668.7 मि. मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी 2153.7 मि. मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी याच तारखेला पाणीपातळी एक फुटाने जादा होती. पाणलोट क्षेत्रातील तुडये, इनाम बडस, बैलूर, बेटगिरी, बाकमूर, मळवी परिसरात हजेरी लावल्याने सोमवारी सकाळी पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. या पावसामुळे शहरातील पाणी समस्या दूर होणार आहे.