वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये गुऊवार, 7 सप्टेंबर रोजी काही फुगे झाडाला लटकलेले आढळले. या फुग्यांसोबत पाकिस्तानचा झेंडाही जोडलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर तहसीलच्या प्याला गावातील लोकांनी हे फुगे पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. वाऱ्यासह भारताच्या दिशेने आलेले हे फुगे पाकिस्तानातील कोणीतरी उडवले असावेत, असा दावा केला जात आहे. मात्र, या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. पाकिस्तानी ध्वजामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे. जम्मूमध्ये लष्कराचा तीन दिवसीय नॉर्थ टेक सेमिनार 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे सहभागी होणार आहेत. यामध्ये 50 स्टार्टअप्स, 250 हून अधिक कंपन्या त्यांची वैविध्यपूर्ण लष्करी उपकरणे प्रदर्शित करतील. या सर्व कार्यक्रमापूर्वी फुगे आणि पाकिस्तानी ध्वज आढळल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.