14 जुलै रोजी चांद्रयान-3 चे होणार प्रक्षेपण
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 14 जुलै रोजीच्या प्रस्तावित स्वत:च्या तिसऱ्या चांद्रमोहिमेच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीहरिकोटाच्या दूरसंचार विभागाने सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सतीश धवन अंतराळ केंद्राच्या आसपास खोदकाम आणि सर्वप्रकारच्या बांधकामांवर बंदी घातली आहे. या तात्पुरत्या बंदीचा उद्देश ऑप्टिकल फायबर केबल समवेत महत्त्वपूर्ण दूरसंचार लाइन्सची सुरक्षा करणे आहे. इस्रोकडून करण्यात येणाऱ्या प्रक्षेपणपूर्व परीक्षणांसाठी ही सेवा सुरू असणे आवश्यक आहे.
इस्रोकडून 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम3-एम4 प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यासंबंधी कुठल्याही अडथळ्याशिवाय दूरसंचार सेवा सुरू राहणे अत्यंत आवश्यक आहे. बीएसएनएलकडे इस्रोच्या अंतराळ केंद्राला जोडणाऱ्या प्रमुख संचार लिंक कार्यरत ठेवण्याची जबाबदारी आहे. प्रमुख संचार लिंक एनएच5 (चेन्नई-पेरंबूर-गुम्मिडिपुंडी), एनएच205 (चेन्नई&-तिरुवल्लुर) राज्य महामार्ग 56 (पेराम्बुर-पोन्नेरी) आणि राज्य महामार्ग 50 (तिरुवल्लूर-उथुकोटाई) येथून जात असल्याचे समजते.
प्रक्षेपण मोहीम यशस्वीपणे पार पडावी म्हणून 9-14 जुलै या कालावधीदरम्यान रस्ता रुंदीकरण, रस्त्याची दुरुस्ती आणि अन्य खोदकामांमुळे बीएसएनएल ऑप्टिकल फायबर केबल्सना होणारी हानी रोखणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले गेले आहे.
चांद्रयान-3
इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेचे प्रक्षेपण 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून होणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. याचा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी ‘सॉफ्ट लँडिंग’ करेल अशी अपेक्षा आहे. चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान लँडरच्या सॉफ्ट लँडिंगमध्ये यश मिळाले नव्हते. यामुळे चांद्रयान-3 मोहीम भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.