माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारमाध्यमांना दिशानिर्देश जारी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी कठोर पाऊल उचलत इलेक्ट्रॉनिक, प्रिन्ट आणि डिजिटल मीडियाला काही सूचना जारी केल्या. या दिशानिर्देशानुसार ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या जाहिराती दाखवणे थांबवण्यास सांगितले आहे. देशाच्या बहुतांश भागांमध्ये बेटिंग आणि जुगार खेळणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारांमुळे ग्राहकांना आर्थिक आणि सामाजिक धोके पोहोचत असल्यामुळे फसवणुकीसंबंधीच्या ऑनलाईन जाहिराती प्रदर्शित करू नयेत, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. अशा जाहिरातींमुळे देशवासियांना फटका बसू नये, याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसारमाध्यमांमध्ये दिसणाऱया ऑनलाईन बेटिंग वेबसाईट्स/प्लॅटफॉर्मच्या अनेक जाहिरातींच्या उदाहरणांवरून हा सल्ला दिला आहे. काही जाहिराती ग्राहकांसाठी, विशेषतः तरुण मुलांसाठी आर्थिक आणि सामाजिक-आर्थिक धोका निर्माण करत असल्याचे दिशानिर्देशांमध्ये स्पष्ट केले आहे. ऑनलाईन सट्टेबाजीच्या जाहिराती दिशाभूल करणाऱया आहेत आणि त्या ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स रेग्युलेशन कायदा 1995 अंतर्गत जाहिरात कोड आणि पत्रकारितेच्या वर्तनाच्या निकषांनुसार दिलेल्या जाहिरातींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाहीत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 डिसेंबर 2020 रोजी खासगी उपग्रह टीव्ही चॅनेलना ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींवरील जाहिरात मानक परिषद (एएससीआय) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी एक पत्रक जारी केले होते.