श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या श्रीनगर भागात बुधवारी बंद पाळण्यात आला आहे. प्रशासनाने अवैध बांधकामे पाडविण्याची मोहीम हाती घेतली असून तिला विरोध करण्यासाठी हा बंद पाळण्यात आला असा दावा करण्यात आला. श्रीनगरच्या लाल चौक भागातही बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे बंद प्रभावित भागांमधील दुकाने, सार्वजनिक वाहने आणि इतर आस्थापने बंद राहिली. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा बंद कोणत्या संघटनेने पुकारला होता, याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र तो हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेने पुकारला असल्याची अनधिकृत चर्चा होती.