नजमुल हुसेन शांतो मालिकावीर, मुस्तफिजूर रेहमान सामनावीर
वृत्तसंस्था/ चेम्सफोर्ड
बांगलादेश क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आयर्लंडचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील झालेल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंडवर केवळ 5 धावांनी विजय मिळविला. बांगलादेशच्या नजमुल हुसेन शांतोला ‘मालिकावीर’ तर मुस्तफिजूर रेहमानला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. सदर मालिका आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट सुपर लिग अंतर्गत खेळविली गेली.
या शेटवच्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशचा डाव 48.5 षटकात 274 धावात आटोपला. त्यानंतर आयर्लंडने 50 षटकात 9 बाद 269 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ 5 धावांनी गमवावा लागला.
बांगलादेशच्या डावामध्ये कर्णधार तमीम इक्बालने 82 चेंडूत 6 चौकारांसह 69, नजमुल हुसेन शांतोने 32 चेंडूत 7 चौकारांसह 35, लिटन दासने 39 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35, मुस्तफिजूर रहिमने 54 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 45, मेहदी हसन मिराजने 39 चेंडूत 3 चौकारांसह 37, रिदॉयने 1 चौकारासह 13 तर चौधरीने 8 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 2 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे मार्क अॅडेरने 40 धावात 4, मॅकब्राईनने 39 धावात 2, डॉकरेलने 31 धावात 2 तर यंगने 53 धावात 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात 3 फलंदाजांनी अर्धशतके झळकवली. पॉल स्टर्लिंगने 73 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 60, कर्णधार बलबर्नीने 78 चेंडूत 6 चौकारांसह 53 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची शतकी भागिदारी केली. टेक्टरने 48 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 45 तर टकरने 53 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 50 तसेच मार्क अॅडेरने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. टेक्टर आणि टकर या जोडीने चौथ्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. आयर्लंडच्या डावात 6 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मुस्तफिजूर रेहमानने 44 धावात 4 तर हसन मेहमूदने 44 धावात 2 तसेच इबादत हुसेन, मेहदी हसन मिराज आणि नजमूल हुसेन शांतो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश : 48.5 षटकात सर्व बाद 274 (तमीम इक्बाल 69, नजमुल हुसेन शांतो 35, लिटन दास 35, रिदॉय 13, मुश्फीकुर रहिम 45, मेहदी हसन मिराज 37, अवांतर 26, अॅडेर 4-40, मॅकब्राईन 2-39, डॉकरेल 2-31, यंग 1-53).
आयर्लंड : 50 षटकात 9 बाद 269 (स्टर्लिंग 60, बलबर्नी 53, टेक्टर 45, टकर 50, अॅडेर 20, अवांतर 25, मुस्तफिजूर रेहमान 4-44, हसन मेहमूद 2-44, इबादत हुसेन, मेहदी हसन मिराज आणि नजमुल हुसेन शांतो प्रत्येकी 1 बळी).