वृत्तसंस्था /ढाका
भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या 2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश क्रिकेट संघाच्या तांत्रिक सल्लागारपदी भारताचे माजी फिरकी गोलंदाज श्रीधरन श्रीराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर घोषणा बांगलादेश क्रिकेट मंडळाने केली आहे. बांगलादेश क्रिकेट संघ 27 सप्टेंबरला गौहत्तीमध्ये दाखल होणार असून त्यानंतर एस. श्रीराम बांगलादेश संघाबरोबर राहतील. या आगामी स्पर्धेपूर्वी बांगलादेशचा संघ दोन सरावाचे सामने खेळणार आहेत. अलीकडेच बांगलादेश क्रिकेट संघाच्या संचालकपदाची सुत्रे खलिद मेहमुदकडे सोपवण्यात आली आहेत. आता एस. श्रीराम खलिद मेहमुद यांना भारतीय खेळपट्ट्या आणि वातावरण या संदर्भात माहिती देतील. 2022 च्या प्रारंभी श्रीराम हे बांगलादेशच्या टी-20 संघाचे प्रमुख प्रशिक्षकही होते. या आगामी स्पर्धेत बांगलादेशचा सलामीचा सामना अफगाणबरोबर 7 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणार आहे.