चिंबल ग्रामसभेत पंचायत मंडळ ग्रामस्थांकडून धारेवर : वेळीच जागे होऊन चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी /तिसवाडी
इंदिरानगर चिंबल येथे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडले होते. या पार्श्वभूमीवर चिंबल भागात राहणाऱया परप्रांतीयांची कुठलीही माहिती पंचायतीकडे नाही. चिंबल येथील इंदिरानगर झोपडपट्टीतही काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी मोठे प्रकरण घडण्यापूर्वी पंचायतीने जागे व्हावे, अशी मागणी करत चिंबलवासियांनी ग्रामसभेत पंचायतीला धारेवर धरले.
विद्यमान सरपंच संदेश शिरोडकर व उपसरपंच वनिता नाईक यांच्या अध्यक्षतेखाली चिंबल पंचायतीची ग्रामसभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाले परप्रातीयांचा विषयावर जोरदार चर्चा झाली.
पंचायतीकडे भाडेकरुंची माहिती नाही
बांगलादेशींची माहिती सोडाच, पण चिंबल क्षेत्रातील किती घरे, फ्लॅट, खोल्या भाडय़ाने दिल्या आहेत. त्यामध्ये कोण राहते याचासुद्धा पत्ता पंचायतीला नाही. अशा बेकायदेशीर गोष्टीना आळा घालण्यासाठी पंचायतीने आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र त्याकडे पंचायत दुर्लक्ष करीत आहे.
वीस कलमी घरांची चौकशी करावी
20 कलमी कार्यक्रमांतर्गत सरकारने 30 वर्षांपूर्वी बेघर लोकांना घरे दिली होती. मात्र त्या घरमालकांनी एक तर ही घरे परप्रांतीयांना भाडय़ाने दिली किंवा विकली आहेत. ज्या लोकांना 20 कलमी कार्यक्रमांतर्गत घरे दिली होती. त्या घरांची पुढे काय झाले, याची कसून तपासणी चौकशी व्हावी, अशी मागणी गोविंद शिरोडकर यांनी केली. पंचायतीने ही मागणी मान्य करून प्रस्ताव स्वीकारला.
ग्रामसभेत चिंबल जंक्शन येथे आगामी दोन वर्षांत फ्लाय ओव्हर उभारणे, चिंबल क्षेत्रातील बेकायदेशीर गाडय़ांवर कारवाई करणे, चिंबल पंचायत क्षेत्रात येणाऱया विकास प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध करणे, आदी महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.
अतिक्रमणांना आळा घालणार
चिंबल भागांतील खुल्या जागामध्ये परप्रांतीय तसेच बिल्डर लॉबीकडून अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे याला वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी केली. उपसरपंचानी ही बाब मान्य करून या प्रकरणी चौकशी केली जाईल. अतिक्रमण करणाऱयांवर कायदानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.