पुणे / प्रतिनिधी :
बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा तरी बालेकिल्ला आहे, असे अनेकांना इतके दिवस वाटत होते. याठिकाणी कधीतरी दुसऱ्या पक्षाचेही खासदार होते. त्यामुळे आता बारामती बालेकिल्ला आहे, असा दावा कोण करत असेल, तर तो दावा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फोल ठरणार आहे, असा विश्वास प्रभारी व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला. दरम्यान, अमेठीमध्ये आम्ही काँगेसचा गड पराभूत केला. तर, आता आमचे लक्ष्य बारामातीकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रा. शिंदे म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघ येत्या लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने पक्षाने आराखडा तयार केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा तीन दिवसांचा दौरा त्यासाठीच आहे. आता तिथे कमळ फुलणारच आहे. यावेळी आम्ही निवडणुकीच्या 18 महिने आधीच काम सुरू केले आहे. अमेठीसारखा लोकसभा मतदारसंघ, ज्याने देशाला इतके पंतप्रधान दिले तो मतदारसंघही भाजपने काबीज केला. त्यासमोर बारामती लोकसभा मतदारसंघ काहीच नाही.
आम्हाला दोन प्रयत्नात यश आले नाही. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात आम्ही यश निश्चित मिळवू. उत्तर प्रदेश मधील अमेठी मतदारसंघाप्रमाणे आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात बाजू मारू. आतापर्यंत मतदारसंघात आमचे तीन दौरे झाले आहेत. जनतेच्या मनात भाजपला पाठिंबा दिसत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीमध्ये येणार, हे निश्चित झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे या केवळ सोशल मीडियावर सक्रिय होत्या. परंतु, त्या मतदारसंघात फिरू लागल्या आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित विकासाच्या योजना मान्य कराव्यात, अशी मागणी सीतारामन यांच्याकडे आम्ही करणार आहोत.